Navratri 2020: यंदा ५८ वर्षांनी आला शुभयोग, काय आहे अश्वारूढ दुर्गादेवीचे महात्म्य? जाणून घ्या

आध्यात्म
Updated Oct 17, 2020 | 08:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

यावर्षी शारदीय नवरात्र १७ ऑक्टोबरपासून चालू होत आहे. या नवरात्रीची खास बाब अशी की यावर्षी तिथ्यांचे नुकसान होणार नाही. यंदा पूर्ण नऊ दिवसांचे नवरात्र आहे जे अत्यंत शुभ मानले जाते.

Navratri 2020
Navratri 2020: काय आहेत यंदा 5८ वर्षांनी येणारे शुभयोग, काय आहे अश्वारूढ दुर्गादेवीचे महात्म्य? जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • देवीच्या प्रत्येक वाहनामागे लपले आहेत गूढ संकेत
  • कलश स्थापनेचा मुहूर्त
  • अखंड ज्योतीचे महत्व

Navratri 2020: यावर्षी शारदीय नवरात्र (Sharadiya Navratra) १७ ऑक्टोबरपासून चालू होत आहे. या नवरात्रीची खास बाब अशी की यावर्षी तिथ्यांचे नुकसान होणार नाही. अनेकदा नवरात्रीत चतुर्थी-पंचमी, षष्ठी-सप्तमी किंवा सप्तमी-अष्टमी एकाच दिवशी येतात आणि नवरात्र आठच दिवसात पूर्ण होते, पण यंदा पूर्ण नऊ दिवसांचे नवरात्र आहे जे अत्यंत शुभ मानले जाते.

देवीच्या प्रत्येक वाहनामागे लपले आहेत गूढ संकेत

देवी दुर्गा जेव्हा नवरात्रीत कैलासावरून पृथ्वीवर अवतरित होते तेव्हा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वाहनावर स्वार होऊन येते. या प्रत्येक दिवसामागे आणि वाहनामागे वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. जर नवरात्रीच्या प्रतिपदेला (पहिल्या दिवशी) रविवार किंवा सोमवार असेल तर देवी गजराज म्हणजे हत्तीवर स्वार होऊन येते. जर प्रतिपदा मंगळवारी किंवा शनिवारी आली तर घोड्यावर स्वार होऊन येते. गुरुवारी किंवा शुक्रवारी आलेल्या प्रतिपदेला देवी पालखीत स्वार होऊन येते आणि जर प्रतिपदा बुधवारी पडली तर ती जलमार्गाने नावेवर स्वार होऊन येते. पृथ्वीवर येऊन ती अतिसूक्ष्मरूपात कलशात स्थापित होते. त्यामुळे नवरात्रात कलशस्थापनेला विशेष महत्व आहे.

काय आहे दुर्लभ योग

आज जो योग आहे तो ५८ वर्षांपूर्वी म्हणजेच २९ सप्टेंबर १९६२ रोजी आला होता. यावेळी सूर्याचे राशीपरिवर्तन होत आहे. सूर्य तूळ राशीत जाणार आहे. तूळ ही सूर्यासाठी निहित रास आहे, पण तरीही सूर्य तूळ राशीत जाणार आहे. बुध आधीपासूनच तूळ राशीत आहे. अशाप्रकारे बुध-सूर्याचा योग होईल. हे शुभकाळाचे प्रतीक आहे. अशाप्रकारे नऊ दिवसांचे नवरात्र आणि बुध-सूर्याचा योग यामुळे ही नवरात्र अधिक शुभ असणार आहे.           

कलश स्थापनेचा मुहूर्त

नवरात्रात कलश स्थापनेला फार महत्व असते. यावेळी कलश ठेवण्याची परंपरा शतकांपासून चालत आलेली आहे. आपण भलेही प्रतिमेची स्थापना करू नका, व्रत-उपवास करू नका, पण दुर्गादेवीचे आवाहन करण्यासाठी कलशाची स्थापना अवश्य करा.असे मानले जाते की देवी दुर्गा याच कलशात सूक्ष्मरूपाने स्थापित होते. कलशाची स्थापना सकाळी ६:२३ ते १०:१२ या वेळात कधीही करता येईल. नवरात्रात पूर्ण नऊ दिवस या कलशाची पूजा करणे हे दुर्गादेवीच्या पूजेसमान आहे.

अखंड ज्योतीचे महत्व

अखंड दीप आणि दीपदान याला आपल्या शास्त्रांमध्ये फार महत्व आहे. देवी भगवतीचे या दिव्यात वास्तव्य असते असे मानले जाते. ज्वालादेवी मंदिरात देवी भगवतीची ज्वालेच्या रुपात पूजा केली जाते. नवरात्रीत देवी भगवतीसाठी आपण नऊ दिवस अखंड ज्योत तेवत ठेवतो. याचे काही नियम आहेत. तांबे, पितळे किंवा अष्टधातूंपैकी कोणत्याही एका धातूची ताटली घ्या. लाल चंदन किंवा कुंकवाचे पाणी किंवा तुपातील मिश्रण तयार करून त्याने ताटलीत सहा पंख काढा. मध्यभागी थोडे तांदूळ आणि फूल ठेवा. यावर दिवा ठेवा. नवरात्रीत अखंड दिव्यासाठी कापसाची ६ इंचाची मोठी वात तयार करा.

बाजारात पितळ्याचा मोठा आणि खोल दिवा उपलब्ध आहे. त्यात वात लावून तूप किंवा तेल घाला. आता देवी भगवतीचे ध्यान करत दिवा लावा. दिव्याला नमस्कार करून त्याची साग्रसंगीत पूजा करा. दिव्यावर चंदन, अक्षता आणि फळे वाहा. एका व्यक्तीने या दिव्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी