Chocolate Ganpati: गणेश चतुर्थीचा उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे. वाजत-गाजत घरोघरी गणरायांचे आगमन झाले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून इकोफ्रेंडली गणेशपूर्ती आणि देखावे करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुजरातमधील शिल्पा भट्ट यांनी चॉकलेट्सच्या मदतीने गणपती बाप्पा साकारला आहे.
अहमदाबाद येथील शिल्पा भट्ट यांनी आपल्या कलेचा वापर करत गणपती बाप्पाची चॉकलेटपासून इकोफ्रेंडली मूर्ती बनवली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देण्यासाठी त्यांनी चॉकलेट्सपासून जवळपास 10 गणपती मूर्ती बनवल्या आहेत.
हा खास चॉकलेटचा गणपती बनवण्यासाठी त्यांना 5 ते 10 दिवसांचा कालावधी लागला. इतकेच नाही तर त्यांना ही गणरायाची मूर्ती साकारण्यासाठी 200 हून अधिक बेल्जियन डार्क चॉकलेट्स आणि व्हाईट चॉकलेटचा वापर करण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या या चॉकलेटच्या मूर्तीचं विसर्जन दूध किंवा गरम पाण्यात केलं जाणार आहे.