Constitution Day संविधान दिवसाचे भाषण, महत्त्वाचे दहा मुद्दे

10 Points Students Can Include In Constitution Day Speech, Essay भारतात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि २६ नोव्हेंबरला संविधान दिन (संविधान दिवस) साजरा करतात. यंदा शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतात संविधान दिवस साजरा होईल. देशाच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. या घटनेचे स्मरण करण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो.

10 Points Students Can Include In Constitution Day Speech, Essay
Constitution Day संविधान दिवसाचे भाषण, महत्त्वाचे दहा मुद्दे 
थोडं पण कामाचं
 • संविधान दिवसाचे भाषण, महत्त्वाचे दहा मुद्दे
 • भारतीय संविधानाची अस्तित्वात असलेली प्रस्तावना...
 • भारताच्या संविधानाविषयी विशेष माहिती

10 Points Students Can Include In Constitution Day Speech, Essay नवी दिल्ली: भारतात १९४९ पासून दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. देशाच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. या घटनेचे स्मरण करण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने संविधान भारतात अंमलात आले तो दिवस २६ जानेवारी १९५० हा आहे. यामुळे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि २६ नोव्हेंबरला संविधान दिन (संविधान दिवस) साजरा करतात. यंदा शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतात संविधान दिवस साजरा होईल. 

भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले. देशाच्या संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू केले. या कामासाठी स्थापन केलेल्या समितीचे नेतृत्व देशाचे त्यावेळचे कायदामंत्री डॉ. भिमराव आंबेडकर करत होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. पुढे डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. 

डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वातील समितीने प्रदीर्घ चर्चेअंती तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेसमोर चर्चेसाठी आला. काही बदलांनंतर संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने २६ जानेवारी १९५० पासून संविधान अंमलात आले. 

संविधानाच्या प्रस्तावनेत भारत सार्वभौम लोकशाही गणराज्य असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. पुढे इंदिरा गांधी यांचे सरकार असताना घटनादुरुस्ती करुन प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला. यामुळे भारत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा उल्लेख केला गेला.

अशी आहे भारतीय संविधानाची अस्तित्वात असलेली प्रस्तावना...

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस : सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय : विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य : दर्जाची व संधीची समानता : निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून : आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. 

भारताच्या संविधानाविषयी विशेष माहितीः

 1. भारताचे संविधान ब्रिटन, आयर्लंड, जपान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यासह अन्य देशांच्या मसुद्यांनी प्रेरित आहे. 
 2. भारताच्या संविधान सभेची स्थापना १९४६ मध्ये झाली. या सभेचे कामकाज २ वर्ष ११ महिने, १८ दिवस यात सामावलेले १६६ दिवस सुरू होते. 
 3. भारताचे संविधान एक हस्तलिखित दस्तावेज आहे. हा जगातील सर्वात मोठ्या हस्तलिखित दस्तावेजांपैकी एक आहे. मूळ इंग्रजी मसुद्यात १ लाख १७ हजार ३६९ शब्द आहेत. 
 4. भारताच्या मूळ संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा प्रस्तावनेत थेट उल्लेख नव्हता. पण ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा थेट समावेश केला.  प्रस्तावनेत १९७६ मध्ये ही घटनादुरुस्ती झाली. प्रस्तावनेत आतापर्यंत झालेली ही एकमेव घटनादुरुस्ती आहे.
 5. भारतीय संविधानाची मूळ संरचना भारत सरकार अधिनियम १९३५ वर आधारित आहे. 
 6. भारतीय संविधानाची मूळ हस्तलिखित प्रत आजही संसदेच्या पुस्तकालयात उपलब्ध आहे.
 7. भारताच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या मुसद्याला मंजुरी दिली. ही मंजुरी मिळताच जयजयकार, जयघोष, बाक वाजवणे या पद्धतीने संविधान सभेच्या सदस्यांनी आनंद साजरा केला.
 8. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. गांधीविचारांनी हा एक अनोखा विजय मिळवल्याचे ते म्हणाले. 
 9. संविधानाच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर जण-गण-मन झाले आणि संविधान सभेचे त्या दिवशीचे कामकाज संपले. स्वातंत्र्यसैनिक पूर्णिमा बॅनर्जी यांनी जण-गण-मन हे राष्ट्रगीत गायले.
 10. संविधानातील तरतुदीनुसार सभागृहाने २४ जानेवारी १९५० रोजी देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींची निवड झाली. एका विशेष अधिवेशनात संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी