नवी दिल्ली: शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदार देखील उद्धव ठाकरेंनी जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याची सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण राजधानी दिल्लीत शिवसेना खासदारांची बैठक झाली असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे आता आमदारांप्रमाणेच खासदार देखील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का? अशी जोरदार चर्चा सुरु आहे.
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांच्या दिल्लीत निवासस्थानी काल (8 जुलै) रात्री साधारण शिवसेनेच्या १० खासदारांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीत असतानाच १० खासदारांची बैठक पार पडल्याने आता शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात जवळजवळ साडेतीन तास बैठक पार पडली. त्याचवेली रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांच्या घरी शिवसेनेच्या १० खासदारांचीही बैठक सुरु होती. अशावेळी आता शिवसेना खासदार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक वाचा: उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे
जेव्हा आमदारांनी बंड पुकारलं तेव्हापासूनच शिवसेनेचे काही खासदारही बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
काही दिवसांपूर्वीच राहुल शेवाळे यांच्यासह काही खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं की, आपल्या पक्षाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. अशी उघड भूमिका खासदार घेत असल्याने त्यांचाही कल भाजपकडेच असल्याचं दिसतं आहे.
अधिक वाचा: धनुष्यबाण निशाणीबाबत उद्धव ठाकरे म्हणतात...
दरम्यान, कृपाल तुमाणे यांच्या घरी झालेल्या नेमके कोणकोणते खासदार हजर होते याबाबत अद्याप नावं समजू शकलेली नाहीत. पण साधारण दीड ते दोन तास ही बैठक सुरु असल्याचं समजतं आहे. याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची चर्चा देखील खासदारांमध्ये झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. असं असताना आता आमदारांसोबतच खासदार देखील उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेणार असल्याचं चित्र राजधानी दिल्लीत पाहायला मिळत आहे. या सगळ्या परिस्थितीच भाजप देखील फायदा घेण्यास नक्कीच उत्सुक असेल त्यामुळे पुढचे काही दिवस हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अधिक आवाहनात्मक असणार आहेत.
अधिक वाचा: 'ही' देवेंद्र फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?
12 खासदार फुटणार?
दुसरीकडे राहुल शेवाळे आणि भावना गवळी यांच्यासह शिवसेनेचे 12 लोकसभा सदस्य हे एकनाथ शिंदे यांना भेटले असल्याची जोरदार चर्चा आहे.'उद्या आषाढी एकादशी झाल्यानंतर हे आमदार शिवसेना सोडणार असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, शिवसेनेकडून या सगळ्या अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे.