Tiger : भारतात १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू, देशात उरले २९६७ वाघ

1059 tiger deaths in 10 years says NTCA : राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (National Tiger Conservation Authority - NTCA) अहवालानुसार भारतात १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू झाला. देशात आता २९६७ वाघ जीवंत उरले आहेत. 

1059 tiger deaths in 10 years says NTCA
भारतात १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Tiger : भारतात १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू
  • देशात उरले २९६७ वाघ
  • जन्माला येणाऱ्या वाघांपैकी ७० टक्के वाघांचा मृत्यू हा जन्म ते १५ महिने या काळात नैसर्गिकरित्या

1059 tiger deaths in 10 years says NTCA : नवी दिल्ली : राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (National Tiger Conservation Authority - NTCA) अहवालानुसार भारतात १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू झाला. देशात आता २९६७ वाघ जीवंत उरले आहेत. 

मागील दहा वर्षात ज्या वाघांचा मृत्यू झाला त्यापैकी २०२ वाघांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला. महाराष्ट्रात १४१, कर्नाटकमध्ये १२३, उत्तराखंड ९३, आसाममध्ये ६०, तामीळनाडूत ६२, उत्तर प्रदेशात ४४, केरळमध्ये ४५ वाघांचा मृत्यू मागील दहा वर्षात झाला. ही आकडेवारी २०१२ ते २०२२ या कालावधीतील आहे. 

यंदाच्या वर्षी आतापर्यंत ७५ वाघांचा मृत्यू झाला. याआधी मागच्या वर्षी (२०२१) देशात १२७ वाघांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (National Tiger Conservation Authority - NTCA) अहवालानुसार मागील दहा वर्षांत सर्वाधिक वाघांचा मृत्यू २०२१ या एका वर्षात झाला. मागील दीड वर्षात मध्यप्रदेशात ६८ तर महाराष्ट्रात ४२ वाघांचा मृत्यू झाला. 

जन्माला येणाऱ्या वाघांपैकी ७० टक्के वाघांचा मृत्यू हा जन्म ते १५ महिने या काळात नैसर्गिकरित्या होतो. भारतात मध्यप्रदेशमध्ये वाघांची संख्या आणि वाघांचा जन्मदर जास्त आहे. याच कारणामुळे मध्यप्रदेशमध्ये वाघांचा मृत्यूदर पण जास्त आहे. 

वाघाचा मृत्यू झाला तरी त्याच्या शरीराचे जंगलात वेगाने विघटन होते. मृत वाघाला खाणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. जंगलात मृत वाघांची नैसर्गिकरित्या वेगाने विल्हेवाट लागते. पण सरसकट सर्व वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणाने होत नाही. शिकार करून पण वाघांना मारले जाते. वाघाचे कातडे, वाघाची नखे (वाघनखे), वाघाचे दात या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. याच कारणामुळे वाघांची शिकार होते. वाघांना गोळ्या झाडून (गोळीबार), विष घालून अथवा विजेचे झटके देऊन ठार केले जाते. याच कारणामुळे वाघांच्या संरक्षणासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

भारतात वाघाच्या शिकारीवर बंदी आहे. वाघ हा देशाचा राष्ट्रीय प्राणी 
आहे. सरकारी पातळीवर वाघांच्या रक्षणासाठी मोहीम राबवली जाते. हे प्रयत्न सुरू असूनही देशात वाघांची शिकार होत आहे.

देशात आता २९६७ वाघ जीवंत उरले आहेत. यापैकी ५२६ वाघ मध्य प्रदेश या एकाच राज्यात आहेत. देशात ३.८१ लाख चौरस किलोमीटर जंगलात वाघांचे वास्तव्य आहे. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने (National Tiger Conservation Authority - NTCA) वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देशात १४१ ठिकाणी सेन्सर आणि कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे. एकूण २६ हजार ८३८ सेन्सर आणि कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाघांच्या रक्षणासाठी सरकारी पातळीवरून जनजागृती पण सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी