गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ५ जणांना वाचविण्यात यश 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 13, 2019 | 10:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

11 Devotee Unfortunate Deaths: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटून तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. तर ५ जणांना वाचविण्यात यश आलं आहे.

bhopal_ani
गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • गणपती विसर्जनादरम्यान घडली मोठ दुर्घटना
  • भोपाळमधील तलावात विसर्जनादरम्यान बुडून ११ जणांचा मृत्यू 
  • एनडीआरएफच्या टीमने ५ जणांना वाचवलं

भोपाळ: मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एक बोट तलावात पलटी झाली. ज्यामुळे तब्बल ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पाच जणांना वाचविण्यात यश आलं आहे. ही दुर्घटना भोपाळमधील प्रसिद्ध छोटा तलाव येथील खाटलापुरा घाटावर घडली. खाटलापुरा घाटाजवळ आज पहाटे साडे चार वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. 

मध्यप्रदेशमधील कॅबिनेट मंत्री पीसी शर्मा यांनी या दुर्घटनेच्या चौकशीची आदेश दिले आहेत. तसंच त्यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना जवळजवळ चार लाखांची मदत जाहीर केली आहे. 

दरम्यान, बचाव पथकाकडून बचाव कार्य अद्यापही सुरु आहे. गणपती विसर्जनासाठी बोटीवर जवळजवळ १९ जण होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे खाटलापुरा येथील हा तलाव कोठाकाठ भरला आहे. याच तलावात गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यात येत होतं. मूर्ती विसर्जनादरम्यान बोटही एका बाजूला कलंडली ज्यामुळे बोटीतील सर्वच जण हे पाण्यात बुडाले. ज्यापैकी अनेक जण हे मूर्तीच्या खाली आहे. यापैकी ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 

ज्या बोटीमधून गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यात येत होतं ती बोट खूपच छोटी होती. तर गणपती मूर्ती मात्र बरीच मोठी होती. त्यामुळे मूर्तीचं पाण्यात विसर्जन करताना बोटीचा तोल गेल्याने यातील भाविक पाण्यात पडले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह एसडीआरएफची टीम देखील बचाव कार्यासाठी तात्काळ रवाना झाली होती. ज्या ११ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला ते सर्वच्या सर्व जण पिपलानी येथील ११०० क्वार्टर या परिसरात राहणारे होते. बचाव कार्यादरम्यान एसडीआरएफच्या टीमने पाच जणांना वाचवलं. 

दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं असून चौकशीचेही आदेश दिले आहेत. तसंच दोषींविरोधात कठोर कारवाईचं देखील आश्वासन दिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी