भारतात १ कोटी १४ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

11424094 people vaccinated in india भारतात १ कोटी १४ लाख २४ हजार ९४ नागरिकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्यांमध्ये ७५ लाख ४० हजार ६०२ जण आरोग्य सेवेशी संबंधित आहेत.

11424094 people vaccinated in india
भारतात १ कोटी १४ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण 

थोडं पण कामाचं

  • भारतात १ कोटी १४ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
  • महाराष्ट्रात ५३ हजार ११३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण
  • महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.९६ टक्के

नवी दिल्ली: भारतात १ कोटी १४ लाख २४ हजार ९४ नागरिकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्यांमध्ये ७५ लाख ४० हजार ६०२ जण आरोग्य सेवेशी संबंधित आहेत. तसेच ३८ लाख ८३ हजार ४९२ फ्रंटलाइन वर्करना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. (11424094 people vaccinated in india)

आरोग्य सेवेशी संबंधित ७५ लाख ४० हजार ६०२ जणांपैकी ६४ लाख २५ हजार ६० जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला. तर आरोग्य सेवेशी संबंधित ११ लाख १५ हजार ५४२ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस देऊन झाले. देशातील ३८ लाख ८३ हजार ४९२ फ्रंटलाइन वर्करना कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस देण्यात आला.

भारतात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सोमवार, २२ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नोंदवण्यात आलेल्या माहितीआधारे लसीकरणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली.

भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. यातील कोणत्याही एका लसचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी द्यावा लागतो. लसचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात दुसरा डोस घेतल्यापासून एक ते दोन आठवड्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते. काही व्यक्तींच्या बाबतीत रोगप्रतिकारक क्षमता विकसित होण्याचा कालावधी दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवडयांपेक्षा थोडा जास्त असू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार हा फरक पडू शकतो. याच कारणामुळे लसचा पहिला डोस घेतला किंवा दोन्ही डोस घेतले म्हणून कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन करत विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणे, सोशल डिस्टंस न राखणे असा हलगर्जीपणा करणे हिताचे नाही. 

कोरोना विषाणूचे वेगवेगळे अवतार जगभर सक्रीय आहेत. यापैकी काही अवतारांवर भारतीय लस प्रभावी ठरल्या आहेत. पण आपल्या आसपास कोरोना विषाणूचा नक्की कोणता अवतार सक्रीय आहे हे सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही. याच कारणामुळे लस घेतली तरीही कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालायाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत १ कोटी १० लाख ९ हजार ७८४ कोरोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी १ कोटी ७ लाख ४ हजार ५९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशात १ लाख ५६ हजार ४७ मृत्यू झाले आहेत. सध्या देशात १ लाख ४८ हजार ७२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

महाराष्ट्रात ५३ हजार ११३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र हे राज्य भारतात दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर केरळ हे राज्य आहे. महाराष्ट्रात ५३ हजार ११३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ५ हजार २१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर ५ हजार ३५ जण कोरोनामुक्त झाले. राज्यात मागील २४ तासांमध्ये कोरोनामुळे १८ मृत्यूंची नोंद झाली.

महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट ९४.९६ टक्के

महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या ताज्या स्थितीबाबतची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत २१ लाख ६ हजार ९४ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी १९ लाख ९९ हजार ९८२ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे राज्यात ५१ हजार ८०६ मृत्यूची नोंद झाली. सध्या महाराष्ट्रात ५३ हजार ११३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचा कोरोना रिकव्हरी रेट (कोराना रुग्ण बरे होण्याचा दर) ९४.९६ टक्के आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी