118 stitches on woman’s face : स्वतःवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना विरोध करताना महिलेच्या चेहऱ्याला इतक्या जखमा झाल्या की डॉक्टरांना 118 ठिकाणी टाके घालावे लागले. मात्र अखेरपर्यंत त्या नराधमांच्या जुलुमांना बळी न पडता महिला लढा देत राहिली. एकाच वेळी तीन तरुणांनी केलेला हल्ला परतवाना तिच्या जीवावर संकट आलं होतं. मात्र प्राण गेले तरी बेहत्तर असं म्हणत तिघांनाही धडा शिकवण्याचा चंग तिने मनाशी बांधला आणि प्राणपणाने त्यांचा सामना केला. अखेर तिघांना माघार घ्यायला लावूनच ती शांत झाली.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये टीटी नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये ही महिला तिच्या पतीसोबत आली होती. गाडी पार्क करताना तिथल्या काही गुंडांशी तिचा वाद झाला. महिलेला पाहून तिघांनी शिट्ट्या वाजवल्या आणि अश्लिल कमेंट्स पास केल्या. त्यानंतर महिलेनंही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. महिलेच्या अनपेक्षित प्रत्युत्तराने खवळलेल्या तिघांनी वाद घालायला सुरुवात केली आणि हाणामारीची तयारी केली. आक्रमक झालेल्या महिलेनंही त्यांना प्रत्युत्तर देत तिधांपैकी एकाच्या कानशिलात भडकावली. त्यानंतर पतीसोबत ही महिला हॉटेलमध्ये निघून गेली.
दरम्यान, महिलेच्या या वर्तनाने इगो दुखावलेल्या तीन तरुणांनी तिचा बदला घेण्याचा डाव आखला. हॉटेलच्या खालीच महिला येण्याची ते वाट पाहत थांबले. पार्किंग लॉटमध्ये उभी केलेली गाडी घेण्यासाठी महिला येईल, तेव्हा तिच्यावर चालून जाण्याचं तिघांनी ठरवलं.
बदमाशों का सामना करने वाली बहादुर बहन श्रीमती सीमा के निवास पर जाकर भेंट की और हालचाल पूछा। बहन का साहस सराहनीय है। उसने बदमाशों की आपत्तिजनक हरकत पर हिम्मत से मुकाबला किया। राज्य शासन द्वारा बहन सीमा का उपचार करवाया जायेगा और एक लाख रुपए की राशि प्रदान की जायेगी। pic.twitter.com/SM4DATpj3U — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) June 12, 2022
पतीसोबत जेवण झाल्यानंतर महिला पार्किंग लॉटमधून गाडी घेण्यासाठी आली. त्यावेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी तिच्यावर हल्ला केला आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रकाराला न घाबरता महिलेनं धीरानं सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आणि तीन तरुणांशी ती प्राणपणानं लढू लागली. तिघेही तिला खाली पाडण्याचा आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र महिला त्यांना अखेरपर्यंत विरोध करत राहिली. दरम्यान, पेपर कटरने या तिघांनी महिलेवर अनेक वार केले. विशेषतः तिच्या चेहऱ्यावर अनेक वार करून तिला जखमी करण्यात आलं. पतीनं तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिच्या चेहऱ्यावर अनेक वार झाले होते.
अधिक वाचा - Sonia Gandhi Hospitalized : सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, कोरोनाचा त्रास बळावला, प्रकृती स्थिर, उपचार सुरू
पतीनं तातडीनं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तिच्या चेहऱ्यावर 118 टाके घालावे लागल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
महिलेनं दाखवलेल्या धाडसाचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कौतुक केलं आहे. तिला मुख्यमंत्र्यांनी 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलं असून उपचारांचा सर्व खर्च सरकारतर्फे करण्याचं आश्वासन दिलं आहे. महिलेनं दाखवलेलं धाडस अद्बूत आहे आणि इतर महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तीनपैकी दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून पोलीस तिसऱ्या गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.