monkeypox : जगभरात मंकीपॉक्सचे १३ हजार रुग्ण, भारतात ३ मंकीपॉक्स रुग्ण

monkeypox : जगभरात मंकीपॉक्सचे सुमारे १३ हजार रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन मंकीपॉक्सबाधीत रुग्ण भारतातील केरळ राज्यात आढळले आहे.

13 thousand cases of monkeypox worldwide, 3 cases of monkeypox cases in India
जगभरात मंकीपॉक्सचे १३ हजार रुग्ण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जगभरात मंकीपॉक्सचे १३ हजार रुग्ण
  • भारतात ३ मंकीपॉक्स रुग्ण
  • तिन्ही रुग्ण केरळमध्ये आढळले

monkeypox : जगभरात मंकीपॉक्सचे सुमारे १३ हजार रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन मंकीपॉक्सबाधीत रुग्ण भारतातील केरळ राज्यात आढळले आहे. भारतात केरळ वगळता इतरत्र मंकीपॉक्सबाधीत रुग्ण आढळलेला नाही. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात एका लहानग्याला आणि एका बाळाला मंकीपॉक्सची बाधा झाल्याचे वृत्त आहे. ही दोन्ही मुलं अमेरिकेचे नागरिक नसल्याचे समजते. 

मागील अकरा आठवड्यांपासून मंकीपॉक्सच्या जगभरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे सुमारे १३ हजार रुग्ण आढळले आहेत. या तेरा हजार रुग्णांपैकी तीन रुग्ण भारतात आढळले आहेत. हे तिन्ही मंकीपॉक्सबाधीत रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. यामुळे केंद्र सरकार आणि केरळ सरकार परस्पर समन्वय राखून खबरदारीचे उपाय करत आहे. ज्या तिघांना मंकीपॉक्सची बाधा झाल्याचे आढळले आहे त्यांच्या संपर्कातील इतर अनेकांच्या तब्येतीवर सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून आहे. अधूनमधून त्यांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे.

केरळ सरकारच्या चिंतेत वाढ

केरळमध्ये २० हजार ८९६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असतानाच राज्यात तीन मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल (२६ हजार ७२७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण) पहिल्या आणि केरळ दुसऱ्या स्थानावर आहे. या परिस्थितीत देशातील सर्व मंकीपॉक्सचे रुग्ण केरळमध्येच आढळले आहेत. यामुळे केरळ सरकारच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?, मंकीपॉक्सच्या रुग्णावर कसे करावे उपचार?, मंकीपॉक्सच्या रुग्णाने कोणती खबरदारी घ्यावी?

कोरोना प्रमाणे मंकीपॉक्स प्रकरणी आरोग्य आणीबाणी जाहीर करावी की करू नये याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. संघटनेच्या आगामी बैठकीत मंकीपॉक्सचे जगात आढळलेले रुग्ण आणि त्यांच्यावर सुरू असलेले उपचार तसेच घेतली जात असलेली खबरदारी याचा आढावा घेतला जाईल. 

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे कांजिण्या (कांजण्या) या आजारासारखी पण सौम्य स्वरुपाची असतात. मंकीपॉक्स झाल्यावर त्वचेवर लालसर रंगाचे फोड येतात. हे फोड आल्यावर खाजवले तर फोड फुटून त्यातून बाहेर पडणारा द्राव संसर्ग पसरवू शकतो. यामुळे मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ल्याने स्वतंत्र खोलीत राहून उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मंकीपॉक्स हा दोन ते चार आठवड्यात बरा होणारा आजार आहे. पण सध्या या आजारावर ठोस उपचार पद्धती अस्तित्वात आलेली नाही. अनेक डॉक्टर कांजिण्या (कांजण्या) या आजारावर करतात तशा स्वरुपाचे उपचार करून आणि विशिष्ट औषधे लागू पडली नाही तर रुग्णाच्या तब्येतीचा अंदाज घेऊन अनुभवाने औषधे बदलून उपचार करत आहेत. यामुळे सध्या मंकीपॉक्सचा मृत्यूदर ३-६ टक्के आहे. 

मंकीपॉक्स हा आजार १९५८ मध्ये पहिल्यांदा माकडांमध्ये आढळला आणि १९७० मध्ये तो माणसाला झाल्याचे पहिले उदाहरण सापडले. हा आजार प्रामुख्याने आफ्रिका खंडातील मध्य आणि पश्चिम भागातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण अधूनमधूनच आढळले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स झाल्यास ताप येणे, त्वचा लालसर दिसणे, त्वचेवर लालसर रंगाचे फोड येणे, अंगदुखी अशा स्वरुपाची लक्षणे आढळतात.

मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीने आदर्श स्थिती स्वतंत्र खोलीत राहून स्वच्छतेचे नियम पाळून वैद्यकीय उपचार घ्यावे. वैद्यकीय सल्ल्याने पथ्ये आणि औषधोपचार यांचे पालन करावे. मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या वस्तू वापरणे संबंधित व्यक्ती बरी होईपर्यंत टाळावे. मंकीपॉक्स झाल्यावर त्वचेवर लालसर रंगाचे फोड येतात. हे फोड आल्यावर खाजवले तर फोड फुटून त्यातून बाहेर पडणारा द्राव संसर्ग पसरवू शकतो. सर्वांनी ही बाब लक्षात घ्यावी आणि मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीने  शरीरावर आलेले लालसर फोड खाजवून फोडू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी