भारताने जाहीर केली पाकिस्तानमध्ये लपलेल्या १८ दहशतवाद्यांची यादी

18 Pakistan Based Terrorists Designated As Individual Terrorists By India भारताने पाकिस्तानमध्ये लपलेल्या १८ दहशतवाद्यांची यादी UAPA अंतर्गत जाहीर केली.

18 Pakistan Based Terrorists Designated As Individual Terrorists By India
दहशतवादी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारताने जाहीर केली पाकिस्तानमध्ये लपलेल्या १८ दहशतवाद्यांची यादी
  • यूएपीए कायद्यांतर्गत जाहीर केली यादी
  • यादीतील दहशतवाद्यांची संपत्ती जप्त होणार, संपत्तीशी संबंधित असलेल्यांची चौकशी होणार

नवी दिल्ली: भारताने (India) पाकिस्तानमध्ये (Pakistan) लपलेल्या १८ दहशतवाद्यांची यादी (Terrorist List) जाहीर केली. ही यादी केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली. यात १९९३चा मुंबई बॉम्बस्फोट, २६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील हल्ला, पुलवामात झालेला २०१९चा हल्ला, पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या तळावर २०१६मध्ये झालेला हल्ला, आयसी ८१४ या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे १९९९मध्ये झालेले अपहरण, इंडियन मुजाहिदीनचे हल्ले आणि जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले यांचा समावेश आहे. (18 Pakistan Based Terrorists Designated As Individual Terrorists By India)

बेकायदा कारवाया प्रतिबंध अधिनियम (Unlawful Activities Prevention Act - UAPA) अंतर्गत भारताने पाकिस्तानमध्ये लपलेल्या १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली. या यादीत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या साजिद मिर याचाही समावेश आहे. साजिद २६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील हल्ल्यावर कराचीतील कंट्रोल रूममधून लक्ष ठेवून होता.

यूएपीए कायद्यांतर्गत जाहीर केलेल्या यादीतील दहशतवाद्यांची भारतातील संपत्ती जप्त करणे तसेच या संपत्तीशी संबंधित असलेल्या सर्वांची चौकशी करण्याचे अधिकार भारत सरकारकडे आहेत. अनेकदा एखाद्या संघटनेवर बंदी घातल्यानंतर त्या संघटनेचे नेतृत्व करणारी व्यक्ती नव्या नावाने दहशतवादी संघटना सुरू करते. याच कारणामुळे थेट विशिष्ट दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची तरतूद कायद्याने करण्यात आली. 

केंद्र सरकारने यूएपीए अंतर्गत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नेता सय्यद सलाउद्दीन, लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक अब्दुर रहमान मक्की, जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझरचा भाऊ अब्दुल रउफ असगर, इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक रियाझ भटकळ आणि त्याचा भाऊ इकबाल भटकळ, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राइट हँड छोटा शकील, टायगर मेमन आणि जावेद चिकणा यांचा उल्लेख दहशतवादी असा केला आहे. या दहशतवाद्यांची संपत्ती यूएपीए अंतर्गत जप्त करण्याचे तसेच या संपत्तीशी संबंधित असलेल्या सर्वांची चौकशी करण्याचे अधिकार भारत सरकारकडे आहेत.

Print Hindi Release.pdf by Rohan MT

याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये मसूद अझर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, झकी उर रेहमान लखवी या सर्वांना यूएपीए अंतर्गत दहशतवादी ठरवण्यात आले. जुलै २०२० मध्ये केंद्र सरकारने अमेरिकेतील शिख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंहसह नऊ खलिस्तानी दहशतवाद्यांना यूएपीए अंतर्गत दहशतवादी ठरवले. 

भारतात १९६७ पासून यूएपीए अस्तित्वात आहे. मोदी सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये थेट विशिष्ट दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची तरतूद करण्यासाठी यूएपीएमध्ये दुरुस्ती सुचविणारे विधेयक आणून ते संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून मंजूर करुन घेतले. यानंतर यूएपीए अंतर्गत दहशतवाद्यांच्या याद्या जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या दहशतवाद्यांचे नाव जाहीर होत आहे त्यांची देशातील संपत्ती जप्त करण्याची तसेच या संपत्तीशी संबंधित असलेल्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सक्षम करणे तसेच दहशतवादाचा बीमोड करणे यासाठी केंद्र सरकार यूएपीए अंतर्गत दहशतवाद्यांच्या याद्या जाहीर करत आहे. या मोहिमेंतर्गत मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी यूएपीए अंतर्गत १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी