Goa Liberation Day : गोवा मुक्तीसंग्राम दिवस

19 December Goa Liberation Day, PM Narendra Modi Visit Goa For Liberation Day Events : दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस रविवार १९ डिसेंबर २०२१ रोजी आहे.

19 December Goa Liberation Day
Goa Liberation Day : गोवा मुक्तीसंग्राम दिवस 
थोडं पण कामाचं
  • Goa Liberation Day : गोवा मुक्तीसंग्राम दिवस
  • गोवा मुक्तीसंग्राम दिवस यंदा रविवार १९ डिसेंबर २०२१ रोजी आहे
  • पंतप्रधान मोदी गोवा मुक्तीसंग्राम दिवसानिमित्त गोवा दौऱ्यावर

19 December Goa Liberation Day, PM Narendra Modi Visit Goa For Liberation Day Events : दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस रविवार १९ डिसेंबर २०२१ रोजी आहे. 

भारत स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी. भारताला स्वातंत्र्य देऊन इंग्रज मायदेशी निघून गेले. पण चिमुकल्या गोव्यावरील पोर्तुगिजांची सत्ता आणखी चौदा वर्षे कायम होती. पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात श्वास घेण्याची संधी गोवेकरांना १९ डिसेंबर १९६१ रोजी मिळाली.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणामुळे गोवा मुक्ती लांबली. पोर्तुगिजांशी संघर्ष नको असे मवाळ धोरण स्वीकारुन पंतप्रधान नेहरू यांनी गोवेकरांना स्वतंत्र करण्यासाठी ठोस हालचाली करणे टाळले. गोव्यात पोर्तुगिजांविरोधात संघर्ष करत असलेल्या आणि संघर्ष करू इच्छित असलेल्यांना पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय नेहरूंनी घेतला. यानंतर गोव्यात काँग्रेसने पोर्तुगिजांविरुद्ध आक्रमक भूमिका घ्यायची नाही असा पवित्रा घेतला. यामुळे गोवा मुक्ती लांबली.

डॉ. ज्युलिओ मिनेझिस यांनी समाजवादी विचारांच्या डॉ. राम मनोहर लोहिया यांना गोव्यात विश्रांतीसाठी आमंत्रित केले. लोहिया यांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी देऊ पण सार्वजनिक सभा घेण्यास बंदी असेल, असे पोर्तुगिजांनी बजावून सांगितले. लोहिया यांना गोव्यात असताना पोर्तुगिज नागरिकांवर करत असलेल्या अन्यायाची जाणीव झाली. या प्रकाराची चीड आल्यामुळे लोहिया यांनी गोव्यात मडगाव येथे १८ जून १९४६ रोजी जाहीर सभा घेतली. पोर्तुगिजांच्या आदेशाचे उल्लंघन करुन घेतलेल्या या सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

गोवेकरांना पहिल्यांदाच त्यांच्या मनातले ठामपणे बोलणारा एक सक्षम नेता दिसला. यानंतर गोवेकर आणि ब्रिटिश इंडियातून आलेले सत्याग्रही यांनी पोर्तुगिजांविरोधात जाहीर आंदोलन सुरू केले. पोर्तुगिजांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. पण सत्याग्रहींनी माघार घेतली नाही. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने नागरिक गोव्याच्या मुक्तीसाठी सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले. 

गोवा आंदोलन सुरू असतानाच भारत स्वतंत्र झाला. आता भारत सरकारमुळे लवकरच गोवा स्वतंत्र होईल या आशेवर गोवेकर जगत होते. पण नेहरूंनी मवाळ धोरण स्वीकारल्यामुळे गोवा मुक्ती लांबली.

प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे यांसारख्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्याबरोबर गावागावातून अनेक तरुण पुढे आले. 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीज सत्ताधारी आणि त्यांच्या सैन्यावर गनिमी हल्ले सुरू झाले.  अनेक स्वातंत्र्य सैनिक सत्याग्रह करत पोर्तुगीज सत्तेला विरोध करत होते. यात पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस होते. 

डॉ. टी. बी. कुन्हा यांना गोव्यातील राष्ट्रवादी चळवळीचे जनक मानलं जातं. डॉ. कुन्हा यांना आठ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यात त्यांना पोर्तुगालच्या तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. त्यांची १९५३ मध्ये तिथून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी 'आझाद गोवा' आणि स्वतंत्र गोवा नावाची दोन वृत्तपत्र सुरु केली. पण गोवा मुक्त होण्याआधीच त्यांचे निधन झाले.

महाराष्ट्रातून असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकड्या वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. पुण्यात 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना झाली. यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, पं. महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळतुळे, हिरवे गुरुजी यांचा समावेश होता. संगीतकार सुधीर फडके गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने सहभागी झाले. 

सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली पहिली सत्याग्रहींची तुकडी १९५५ मध्ये गोव्याला रवाना झाली. या तुकडीला पोर्तुगीज सुरक्षा पथकाने गोव्याच्या सीमेवर अटक केली. या कारवाईनंतर सातत्याने गोव्यात वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश करण्यासाठी सत्याग्रहींच्या तुकड्या धडकू लागल्या. गोव्याच्या सर्व सीमा या स्वातंत्र्य सैनिकांनी व्यापून टाकल्या.

गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. सुधा जोशी, सिंधुताई देशपांडे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, शांत राव या महिला लढ्यात अग्रभागी होत्या. केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव या पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात धारातीर्थी पडल्या. अनेक जणी जखमी झाल्या.

आंदोलन सुरू असताना १९५८ मध्ये पहिल्यांदा लष्करी कारवाई करुन गोवा भारतात विलीन करावा हा विचार पुढे आला. दिल्लीत वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा झाली. अखेर १८ डिसेंबर १९६१ रोजी भारत सरकारने गोव्यात लष्करी कारवाई करा, असा आदेश दिला. 

पोर्तुगालने ब्रिटन, अमेरिकेकडे मदत मागितली. पण तोपर्यंत आंतरराष्ट्रीय जनमत पोर्तुगीज वसाहतीच्या विरोधात गेले होते. भारताला कारवाईसाठी भक्कम पाठिंबा मिळाला होता. पत्रादेवी येथे स्वतंत्र सैनिकांवर पोर्तुगीज सैन्याने मोठा गोळीबार केला. त्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. यानंतर लष्करी कारवाईच्या हालचालींना वेग आला. अखेर १९ डिसेंबर १९६१ रोजी रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले. पोर्तुगिजांच्या साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा मुक्त झाला.

गोवा मुक्तीच्या या संग्रामाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी १९ डिसेंबर या दिवशी गोवा मुक्तीसंग्राम दिवस साजरा करतात. यंदा गोवा मुक्तीसंग्राम दिनाचे साठावे वर्ष आहे. या निमित्त गोव्यात होणार असलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गोव्यात अनेक विकास योजनांचे उद्घाटन होईल. तसेच पंतप्रधान मोदी गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करणार आहेत. 

गोवा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्यांपैकी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी वयाची ऐंशी-नव्वदी पार केली आहे. पंतप्रधान या स्वातंत्र्यसैनिकांना भेटणार आहेत, त्यांचा सत्कार करणार आहेत. गोवा मुक्तीसंग्रामाशी संबंधित स्टॅम्पचे प्रकाशन पंतप्रधान मोदी करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी