देशातील १ लाख ९१ हजार १८१ जणांना दिला लसचा पहिला डोस

कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता विकसित व्हावी यासाठी भारतात लसीकरण सुरू झाले. पहिल्या दिवशी देशातील १ लाख ९१ हजार १८१ नागरिकांना लसचा पहिला डोस दिला.

1,91,181 beneficiaries vaccinated on day 1 of nationwide vaccination drive
देशातील १ लाख ९१ हजार १८१ जणांना दिला लसचा पहिला डोस 

थोडं पण कामाचं

  • देशातील १ लाख ९१ हजार १८१ जणांना दिला लसचा पहिला डोस
  • जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात
  • कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांच्या मदतीने लसीकरण सुरू

नवी दिल्ली: कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता विकसित व्हावी यासाठी भारतात लसीकरण सुरू झाले. पहिल्या दिवशी देशातील १ लाख ९१ हजार १८१ नागरिकांना लसचा पहिला डोस दिला. लसचा दुसरा डोस घेण्यासाठी या सर्वांना २८ दिवसांनंतर पुन्हा लसीकरण केंद्रावर यावे लागणार आहे. (1,91,181 beneficiaries vaccinated on day 1 of nationwide vaccination drive)

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी को-विन अॅपवर माहितीची नोंदणी करताना काही केंद्रावर तांत्रिक अडचणी आल्या. माहिती अपलोड होण्यास वेळ लागत होता. या तांत्रिक समस्या तंत्रज्ञांच्या मदतीने दूर करण्यात आल्या. पहिल्या दिवशी काही केंद्रांवर लसीकरण मोहीम उशिरा सुरू झाली. संध्याकाळी उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार देशातील १ लाख ९१ हजार १८१ नागरिकांना लसचा पहिला डोस देण्यात आला. याआधी संध्याकाळी साडेपाच पर्यंत देशातील १ लाख ६५ हजार ७१४ जणांना लस डोस पहिला डोस दिल्याचे जाहीर करण्यात आले. उशिरापर्यंत सुरू असलेल्या कामामुळे दिवस संपेपर्यंत १ लाख ९१ हजार १८१ नागरिकांना लसचा पहिला डोस देण्यात आला.

भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश यांना पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसचा पुरवठा करण्यात आला आहे. देशातील १२ राज्यांमध्ये कोविशिल्डसह भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन या लसचा पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्या व्यक्तीला कोणती लस दिली जाणार या संदर्भात निवड करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना सध्या उपलब्ध नाही. कोट्यवधी नागरिकांना लस देण्याचे आव्हान असल्यामुळे दोन कंपन्यांच्या सहकार्याने लसच्या मागणीची पूर्तता सुरू आहे.

भारतात अॅस्ट्राझेंका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रयोगशाळेच्या मदतीने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसची निर्मिती पुण्याची सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था करत आहे. तसेच भारत बायोटेक, आयसीएमआर आणि एनआयव्ही यांनी संयुक्तपणे कोवॅक्सिन ही लस विकसित केली आहे. या दोन्ही लसच्या माध्यमातून देशात लसीकरण सुरू झाले आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर लसीकरण मोहीम सुरू झाली. नागरिकांना मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. 

डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ यांना सर्वात आधी नंतर सैनिक आणि अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी या फ्रंटलाइन वर्करना मग ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना तसेच एक किंवा जास्त गंभीर आजार असलेल्या पन्नाशीच्या नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. यानंतर इतर नागरिकांचे लसीकरण होणार आहे. मोहिमेतील पहिल्या ३ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. 

देशातील ३ हजार ६०० लसीकरण केंद्रांवर लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि पहिल्या दिवशी ठरल्या प्रमाणे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लस देण्यात आली. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसचे १ कोटी १० लाख डोस आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन लसचे ५५ लाख डोस भारत सरकारने खरेदी केले असून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे राज्यांना पुरवले आहेत. या डोसचा वापर लसीकरणासाठी होत आहे.

कोविशिल्ड लस २०० रुपये दराने तर कोवॅक्सिन ही लस २०६ रुपये दराने उपलब्ध आहे. भारतीय बाजारात खुल्या विक्रीसाठी कोवॅक्सिन ही लस ९०० ते एक हजार रुपये या दराने मार्च २०२१ पासून उपलब्ध होणार आहे. तसेच कोविशिल्ड लस ऑगस्ट २०२१ पासून एक हजार रुपये दराने बाजारात उपलब्ध होणार आहे. खुली विक्री सुरू झाल्यावर १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लस खरेदी करुन डॉक्टरांच्या मदतीने लसीकरण करुन घेता येईल.

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लस दोन ते आठ अंश से. तापमानात दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात. भारतातून कोविशिल्ड अनेक देशांना निर्यात होणार आहे. प्रामुख्याने वेगवेगळ्या देशांच्या सरकारकडून कोविशिल्ड लसला मागणी आहे. पण जगभर डॉक्टर, मेडिकल स्टाफ, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने कोविशिल्ड दिली जाणार आहे. अठरा वर्षे झालेले ते पन्नाशीच्या आतले अशा मोठ्या समुदायाची मागणी सरकारी लसीकरणातून लवकर पूर्ण होणे कठीण आहे. याच कारणामुळे मार्चपासून भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन आणि ऑगस्ट महिन्यापासून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या कोविशिल्ड लसची भारतीय बाजारात खुली विक्री सुरू होणार आहे. विक्री सुरू झाल्यामुळे ज्यांना लवकर लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे त्यांची सोय होणार आहे. 

भारत सरकारने सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांशी चर्चा केली. यानंतर एका कंपनीने सरकारी मागणीला तर दुसऱ्या कंपनीने खासगी मागणीला प्राधान्य द्यायचे अशा स्वरुपाचे नियोजन झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारताची लोकसंख्या १३८ कोटींपेक्षा जास्त आहे. यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची संख्या ९० कोटींपेक्षा जास्त आहे. याच कारणामुळे नियोजन करुन लसीकरण सुरू आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.

भारत बायोटेक कंपनी अठरा वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांसाठी एक लस विकसित करत आहे. या लसच्या पहिल्या टप्प्यातील प्रयोगाला परवानगी मिळाली आहे. तसेच नाकातून थेंब टाकून लस देण्यासाठीही भारत बायोटेक कंपनी प्रयोग करत आहे. हे प्रयोग यशस्वी झाले तर कोरोना संकटावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी