Gurugram News: धक्कादायक! गुरूग्राममध्ये ज्यूस पिऊन २५ जण आजारी; प्रसादाच्या नावाखाली पाजले अमली पदार्थ 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 13, 2022 | 16:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gurugram News । गुरुग्राममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण फारुख नगरमध्ये भरलेल्या जत्रेत भाविकांना प्रसादाच्या नावाखाली चक्क नशा असलेले पदार्थ पाजण्यात आले, त्यामुळे 25 जण आजारी पडले आहेत.

25 people sick after drinking juice in Gurugram, Incident at Budho Mata Temple
गुरूग्राममध्ये प्रसादाच्या नावाखाली पाजले अमली पदार्थ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुरुग्राममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
  • भरलेल्या जत्रेत भाविकांना प्रसादाच्या नावाखाली चक्क नशा असलेले पदार्थ पाजण्यात आले.
  • त्यामुळे 25 जण आजारी पडले आहेत.

Gurugram News । नवी दिल्ली : गुरुग्राममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण फारुख नगरमध्ये भरलेल्या जत्रेत भाविकांना प्रसादाच्या नावाखाली चक्क नशा असलेले पदार्थ पाजण्यात आले, त्यामुळे 25 जण आजारी पडले आहेत. अंमली पदार्थांचे सेवन केल्यावर आजारी पडणाऱ्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. प्रसादाच्या नावावर अमली पदार्थ देणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. (25 people sick after drinking juice in Gurugram, Incident at Budho Mata Temple). 

अधिक वाचा : धनंजय मुंडेंना हार्ट अटॅक नाही आला - अजित पवार

बुधो माता मंदिरातील घटना 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख नगर येथील बुधो माता मंदिरात भरलेल्या जत्रेत फळांचा रस प्यायल्याने पंचवीस जण आजारी पडले आहेत. मंदिराजवळ भरलेल्या जत्रेत या लोकांना एका व्यक्तीने प्रसादाच्या नावाने फळांचा रस दिला होता. ज्यूस प्यायल्यानंतर बहुतांश महिला बेशुद्ध झाल्या. फळांच्या रसातच अंमली पदार्थ मिसळल्याचा संशय पोलिसांना आला आहे. 

फारुख नगरचे एसएचओ सुनील बेनिवाल यांनी सांगितले की, "आजारी असलेल्यांना बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चोरी किंवा लूट झाल्याची माहिती नाही. आम्ही फळांचा रस देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत." पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८ (विषाने दुखापत करणे), ३३६ (मानवी जीवन धोक्यात आणणे) आणि १२०-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

अशी घडली घटना 

या प्रकरणातील तक्रार करणाऱ्यांपैकी एक दिल्लीचा रहिवासी सुशील कुमार म्हणाला की, तो आपल्या कुटुंबासह मंदिरात आला होता, "आम्ही आमच्या गाडीतून खाली उतरलो होतो, तेव्हा एक व्यक्ती आला आणि त्याने ग्लासमध्ये फळांचा रस आम्हाला दिला. प्रसाद देऊन तो सर्वांची सेवा करत आहे. मात्र ते प्यायल्यानंतर माझी पत्नी आणि भाची बेशुद्ध पडली आणि इतर लोकही ओरडत होते. असे त्याने म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी