3.8 Magnitude Earthquake In Haryana, Tremors Felt In Delhi : नव्या वर्षाची सुरुवात आज (रविवार 1 जानेवारी 2023) झाली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू हरयाणातील झज्जर येथे जमिनीखाली 5 किमी. अंतरावर होता.
'नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी'च्या (NCS) अहवालानुसार हरयाणात आज (रविवार 1 जानेवारी 2023) मध्यरात्री 1 वाजून 19 मिनिटांनी 3.8 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे जीवितहानी झालेली नाही. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. या वातावरणात अनेकांना भूकंप जाणवला नाही.
मागील काही वर्षांपासून अधूनमधून दिल्ली एनसीआरमध्ये तसेच आसपासच्या ठिकाणी सौम्य स्वरुपाचे भूकंप होत आहेत. दिल्लीला हिमालय रिजनमुळे भूकंपाचा धोका निर्माण झाला आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे शनिवार 31 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5 वाजून 51 मिनिटांनी 2.8 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. हा मागील वर्षात नोंद झालेला भारतातील शेवटचा भूकंप होता. याआधी 21 डिसेंबर 2022 रोजी लाहौल-स्पीति जिल्ह्यात 2.6 रिश्टरच्या तर 16 डिसेंबर 2022 रोजी किन्नौर जिल्ह्यात 3.4 रिश्टरच्या भूकंपाची नोंद झाली.
Pausha Putrada Ekadashi 2023 : कधी आहे 2023 मधील पहिली एकादशी?
भूगर्भात मोठ्या प्रमाणावर हालचाल झाल्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र अद्याप जगातील कोणत्याही संस्थेला खात्रीने विशिष्ट भागात विशिष्ट दिवशी विशिष्ट क्षमतेचा भूकंप येईल असा ठाम अंदाज व्यक्त करणे शक्य झालेले नाही. पावसाप्रमाणे भूकंपाविषयी विश्वासार्ह अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. पण सतत जाणवणाऱ्या सौम्य धक्क्यांमुळे भारतात चिंतेचे वातावरण आहे.