हत्तीणीच्या हत्येप्रकरणी ३ जणांना अटक, इतर 2 जणांचा शोध सुरू

Kerala elephant news:नुकतीच केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. अशाच एका अन्य घटनेशी संबंधित आरोपीचा शोध सुरू आहे.

3 arrested in pregnant elephant murder case search for 2 others continues
हत्तीणीच्या हत्येप्रकरणी ३ जणांना अटक, इतर 2 जणांचा शोध सुरू  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • केरळमधील कोल्लम जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी गर्भवती हत्तीणीची हत्या करण्यात आली होती
  • स्फोटकांनी भरलेले फळ खाल्ल्याने हत्तीणीला झाली होती गंभीर जखम
  • या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन जणांचा शोध सुरू आहे

तिरुअनंतपुरम: केरळच्या कोल्लम जिल्ह्यात यापूर्वी गर्भवती हत्तीणीच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर यापूर्वी पलक्कड जिल्ह्यातील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणातील दोन मुख्य आरोपींचा शोध अद्यापही सुरु आहे. दोन्ही प्रकरणातील हत्तीणींचा मृत्यू एकसारखाच झाला होता. ज्यामध्ये स्फोटकांनी भरलेले अननस खाल्ल्यामुळे आणि त्यामुळे तोंडात गंभीर जखम झाल्यामुळे हत्तीणीचा मृत्यू झाला होता.  

तीन आरोपींना अटक

गेल्या एप्रिल महिन्यात कोल्लम जिल्ह्यात ही घटना घडली होती. तर पलक्कड जिल्ह्यातील ही घटना मार्चमधील आहे. कोल्लम जिल्ह्यातील वन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, येथे हत्तीणीच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात एकूण पाच आरोपी आहेत. त्यातील दोन अद्याप फरार आहेत. त्याचवेळी, पलक्कड जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गर्भवती हत्तीणीच्या हत्येतील दोन मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे. यासंदर्भात एका व्यक्तीला ५ जून रोजी अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केरळ सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले.

'जंगली डुक्कर होते निशाण्यावर' 

दरम्यान, हत्तीणीच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी आपल्या जबाबत म्हटलं आहे की, 'त्यांचे लक्ष्य हत्ती नव्हते, तर जंगली डुक्कर आणि हरिण होते. ज्यांच्यासाठी ते फटक्यांनी भरलेले फळं ठेवली होती. पण हत्तीणीने ते चुकून खाल्लं.'

हत्तीणीला झाल्या होत्या गंभीर जखमा

हत्तीणीच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी तिचा पोस्टमॉर्टम अहवाल आला होता. ज्यात असं म्हटलं होतं की, फटाक्यांच्या स्फोटामुळे तिच्या तोंडात खोल जखमा झाल्या होत्या आणि सुमारे दोन आठवडे ती काहीही खाऊ शकली नाही. या जखमांमुळे होणार्‍या वेदना यामुळे ती साधारण आठवडाभरात जवळील नदीतच जाऊन उभी राहिली. अखेर तिथेच तिने आपले प्राण सोडले. २८ मे रोजी आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, तिच्या शरीरात पाणी भरल्याने फुफ्फुसांनी काम करणं बंद केलं होतं. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना जेव्हा उजेडात आली तेव्हा याप्रकरणी सोशल मीडियात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. तसंच केंद्र सरकारनेही याबाबत गंभीर दखल घेऊन केरळ सरकारकडे अहवाल मागविला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी