Copenhagen shootings : डेन्मार्कची (Denmark) राजधानी कोपनहेगनमधील (Copenhagen) एका मॉलमध्ये (Mall) गोळीबाराची (shooting) घटना घडली आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून किमान तीन जण जखमी झाले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी गोळीबार प्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या कोनातूनही पोलीस त्याचा तपास करत आहेत. या तरुणाने मॉलमधील लोकांवर गोळीबार केल्याचे पोलीस अहवालात म्हटले गेले आहे. पोलिसांनी हल्लेखोर किंवा जखमींबद्दल अधिकची कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, हा हल्ला झाला तेव्हा मॉलमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी एका तरुणाला अटक केली
हल्ल्याबाबत कोपनहेगन पोलिसांनी ट्विटरवर सांगितले की, “फील्ड्स मॉलमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीबाबत आम्ही काहीही बोलण्याच्या स्थितीत नाही. मॉलमध्ये आता मोठ्या संख्येने पोलिस तैनात आहेत. या गोळीबाराबद्दल आम्ही तुम्हाला लवकरच माहिती देऊ. पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे कोपनहेगन पोलिसांनी सांगितले आहे.
आम्ही घटनास्थळी उपस्थित असून या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, गोळीबारादरम्यान मॉलमध्ये गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसले, गोळीबारात अनेक लोक जखमी झाले. अधिकारीही घटनास्थळी पोहोचल्याचे दिसून आले. कोपनहेगनच्या महापौर सोफी एच अँडरसन यांनी या घटनेचे वर्णन "भयानक" असे केले आहे. महापौरांनी मात्र अपघात आणि जीवितहानी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. फील्ड शॉपिंग मॉल 2004 मध्ये उघडला आणि डेन्मार्कचा दुसरा सर्वात मोठा मॉल असल्याचे म्हटले जाते.