गया (बिहार): बिहारमधील गया जिल्ह्यात एका विवाहित महिलेसोबत तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या मते, पोलिसांनी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक देखील केली आहे. एसएसपी राजीव मिश्रा यांच्या मते, तिसऱ्या आरोपीला देखील पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी असं सांगितलं की, याप्रकरणी एक गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जबरदस्तीने पीडित महिलेच्या घरात घुसले आणि त्यांनी महिलेवर बलात्कार केला. ही घटना ७ ऑक्टोबरला घडली आहे. पीडितेला सध्या एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी अशी माहिती देण्यात आली आहे की, पीडित महिला आणि तिच्या पतीचं काही कारणावरुन भांडण झालं होतं. त्यामुळे ती पतीला सोडून मागील अनेक महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री अचानक तीन जणांनी या महिलेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते गेटमधून घुसू शकले नाही त्यावेळी त्यांनी खिडकी तोडली आणि ते घरात घुसले.
सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, या तीनही नराधमांनी महिलेच्या घरातील सर्व लोकांना ओलीस ठेवलं आणि त्यानंतर महिलेच्या खोलीत घुसून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित महिलेने आरोपींना विरोध केल्याने त्यांनी तिला बेदम मारहाण देखील केली. याप्रकरणी पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, एखाद्या घरात घुसून थेट महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेबाबत संपूर्ण बिहारमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन सध्या नितीश कुमार यांच्या सरकावर बरीच टीका देखील सुरु आहे. सर्वा आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.