नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक (Famous Punjabi singer) सिद्धू मूसेवाला (Sidhu Musewala ) (वय २७) याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाबमधील (Punjab) मानसा (Mansa) जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली. विशेष म्हणजे, घटनेच्या एक दिवस आधीच राज्य सरकारने त्याची सुरक्षा काढून घेतली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी सिद्धू मूसेवाला यांच्यावर हल्लेखोरांनी अनेक गोळ्या झाडल्या. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने स्वीकारली आहे. सिद्धू मूसेवाला हा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचा बराच काळ टार्गेट होता. अवघ्या २८ वर्षांच्या सिद्धू या टोळीच्या निशाण्यावर का होता? नेमकी कोणत्या कारणामुळे त्याचा खून करण्यात आला? अशी प्रश्न अनेकांना पडली आहेत.
सिद्धू मूसेवाला यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते जवाहर गावात होते. जीपमध्ये बसलेले असताना त्याच्यावर हल्ला झाला. सिद्धू मूसेवाला आपल्या दोन साथीदारांसह त्याच्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. यावेळी मुसेवाला स्वतः गाडी चालवत होते. घरातून निघाल्यानंतर काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यावेळी जवळपास ३० ते ४० गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्धूला ६ गोळ्या लागल्या होत्या तर त्याचे मित्रही गंभीर जखमी झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी सिद्धू मूसेवालाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 'मूसेवाला यांना सिव्हिल रुग्णालयात आणले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता,' असे सिव्हिल सर्जन डॉ. रणजित राय यांनी सांगितले.
हत्येच्या तीन तासानंतर गँगस्टर गोल्डी बराडने फेसबुक पोस्ट करत हत्येची जबाबदारी घेतली होती. फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये गोल्डी ब्रारने लिहिले होते की, 'आज मूसेवालाची पंजाबमध्ये हत्या करण्यात आली. मी, सचिन बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई याची जबाबदारी घेतो. हे आमचं काम आहे. आमचे बंधू विक्रमजीत सिंग मिदुखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येप्रकरणी मूसेवालाचे नाव पुढे आले होते. पण पंजाब पोलिसांनी मूसेवालावर कोणतीही कारवाई केली नाही. अंकितच्या एन्काउंटरमध्ये मूसेवालाचा सहभाग असल्याचं आम्हाला समजलं. मूसेवाला आमच्या विरोधात काम करत होता. दिल्ली पोलिसांनी त्याचं नावही घेतलं होतं, पण मूसेवाला प्रत्येक वेळी राजकीय ताकदीचा वापर करून स्वतःला वाचवत होता.'
वृत्तानुसार, ७ ऑगस्ट २०२१ रोजी युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत मिदुखेरा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मूसेवालाने या हत्येची जबाबदारी त्याचा मॅनेजर शगुनप्रीत सिंगला दिल्याचं सांगण्यात आलं. या हत्येसाठी शगुनप्रीतने कौशल टोळीच्या सदस्यांना कामावर ठेवल्याचा आरोप आहे. तेव्हापासून शगुनप्रीत सिंग फरार झाला होता. त्यानंतर कौशल टोळीतील सदस्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून सिद्धू मूसेवाला गोल्डी ब्रारा आणि बिश्नोई गँगच्या रडारवर होता.