Bronze Age City Emerges under River | इराकच्या कुर्दिस्तान परिसरात केलेल्या उत्खननातून तब्बल 3400 वर्षांपूर्वीचं एक प्राचीन शहर सापडलं आहे. हे शहर ताम्रयुगातील असल्याचं सांगण्यात येत असून टायग्रिस नदीच्या खाली हे शहर गाडलं गेलं होतं. हजारो वर्षांपूर्वीच्या या शहराचा शोध लागल्यामुळे जगभरातील पुरातत्व तज्ज्ञांचे डोळे या घटनेकडे लागले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीलाच टायग्रिस नदीच्या खाली नवं शहर वसलं असल्याची कुणकूण लागायला सुरुवात झाली होती. इराकमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ऐतिहासिक टायग्रिस नदीचं पात्र पूर्णतः आटलं होतं. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पुरातत्व गटाच्या काही संशोधकांनी उत्खनन सुरू केलं. त्यावेळी प्राचीन शहरांचे काही अवशेष नदीपात्राखाली गाडले गेल्याचे पुरावे त्यांना सापडले. या पुराव्यांचा आधार घेऊन उत्खनन हाती घेण्यात आलं. त्यानंतर अख्खंच्या अख्खं शहरच नदीखाली असल्याचा साक्षात्कार झाला आणि ताम्रयुगातील एका शहराचा शोध लागला.
फोटो सौजन्य - Universities of Freiburg and Tubingen, KAO.
3400 वर्षांपूर्वीचं हे शहर असून त्यातील बहुतांश बांधकाम हे माती आणि विटांचा वापर करून झालेलं आहे. या शहरात अनेक बहुमजली इमारती आहेत. उंचच उंच टॉवरही असल्याचं दिसून आलं आहे. या शहरात एक मोठी बाजारपेठ असण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली असून त्याचा शोध सुरू आहे.
पुरातत्व अभ्यासक डॉ. इवाना पुल्जीझ यांनी दिलेल्या माहितीनुसार या शहरातील इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली माती ही जाडीभरडी आहे. मातीपासून तयार केलेल्या विटांचा वापर बांधकामासाठी करण्यात आला आहे. या विटांवर काही अक्षरंही लिहिण्यात आली आहेत. या अक्षरांचा संदर्भ आणि अर्थ लावण्याचं काम सुरू असून ती तज्ज्ञांकडे पाठवून देण्यात आली आहेत. अक्षरांचा अर्थ समजल्यानंतर नेमक्या कुठल्या काळातील हे बांधकाम आहे, याबाबतची अधिक सखोल माहिती समजण्यास मदत होणार आहे.
फोटो सौजन्य - Universities of Freiburg and Tubingen, KAO.
विशेष म्हणजे इतकी वर्ष हे शहर पाण्याखाली असूनही त्याचा कुठलाच परिणाम इमारतींच्या भिंतीवर झालेला नाही. 1980 च्या दशकात या नदीवर मोठं बांधकाम करण्यात आलं. त्यानंतर आता दुष्काळ पडल्यामुळे उत्खनन करण्यात आलं आणि शहराचा शोध लागला.
या प्राचीन शहराचा शोध लागल्यामुळे आता ताम्रयुगाशी संबंधित अनेक नव्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. बांधकामाची पद्धत, जीवनशैली, विटा आणि मातीचा वापर, विटांवर कोरलेली अक्षरे यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास करून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.