35 Whatsapp Group Ban Spreading Fake News About Agnipath, 10 Arrested : सैन्यात तरुणांची अग्निपथ योजनेच्या माध्यमातून नियुक्ती लवकरच सुरू होणार आहे. पण सैन्याच्या अग्निपथ योजनेविषयी जाणीवपूर्वक काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत. या प्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे. भारतात अग्निपथ योजनेविषयी दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी ३५ व्हॉट्सअॅप ग्रुपवर कारवाई करण्यात आली आहे. हे ग्रुप भारतात बॅन करण्यात आले आहेत. तसेच १० जणांना अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने फॅक्ट चेकिंगसाठी 8799711259 हा नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरच्या माध्यमातून नागरिक माहितीची सत्यता पडताळून पाहू शकतील.
सोशल मीडियाचा वापर करून अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यात आला. सार्वजनिक संपत्तीची जाळपोळ, मोडतोड आणि लूट करण्यात आली. आंदोलन करण्याच्या नावाखाली कायदा हाती घेण्यात आला. या प्रकरणी कॅमेरा फूटेज तपासून कारवाई सुरू आहे. अग्निपथ योजनेविरोधात कायदा हाती घेण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत पुरविणाऱ्या आणि चिथावणी देणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईत वेगवेगळ्या राज्यांमधून सैन्य भरतीसाठी कोचिंग क्लास चालविणाऱ्यांची धरपकड सुरू आहे.
अग्निपथ योजना ठरल्याप्रमाणे अंमलात आणली जाईल. तसेच कायदा हाती घेणाऱ्या, पोलीस रेकॉर्डमध्ये आलेल्या तरुणांना सैन्यात स्थान नसेल; असे सैन्याच्या तिन्ही दलांकडून जाहीर करण्यात आले.