बायको आणि छोट्या भावाचं अफेअर असल्याचा संशय, पुढे घडली भयंकर गोष्ट 

पत्नी आणि लहान भावाचं अफेअर असल्याच्या संशयातून एका ३५ वर्षीय व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.

35 year old man was killed his wife and younger brother it was suspected that they both had affair
बायको आणि छोट्या भावाचं अफेअर असल्याचा संशय, पुढे घडली भयंकर गोष्ट   |  फोटो सौजन्य: Thinkstock

लखीमपूर (उत्तर प्रदेश): एका ३५ वर्षीय व्यक्तीने आपल्या बायको आणि लहान भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडली आहे. यावेळी आरोपी व्यक्तीने आपल्या आईलाही गंभीर दुखापत केली आहे. ही घटना लखीमपूर जिल्ह्यातील नौरंगाबाद येथील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या हत्येमागील नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांना असं वाटतं  आहे की, आरोपीला असा संशय होता की, त्याचा लहान भावाचं आणि त्याच्या पत्नीचं अफेअर होतं. याच संशयातून त्याने दोघांचीही हत्या केली असण्याची दाट शक्यता आहे. मृत महिला आणि पुरुष हे दोघेही ३० वर्षाचे असल्याचं समजतं आहे.

जेव्हा आरोपीने आपल्या बायको आणि पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला त्यावेळी त्यांचा बचाव करण्यासाठी त्याची आई मध्ये पडली. पण आरोपी प्रचंड संतापला होता. त्यामुळे त्याने मागे-पुढे काहीही न पाहता थेट आपल्या आईवर देखील कुऱ्हाडीने हल्ला केला. ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. नंतर तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपी शकील हा मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांच्या हत्येनंतर पळून जाणाऱ्या शकीलला  स्थानिकांनी पकडलं आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं.

दरम्यान, आरोपीने हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी  सांगितले की. या प्रकरणाचा तपास केला जात असून या निर्घृण हत्येमागील नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सध्या आरोपी शकीलला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप तरी त्याने या हत्येबाबत पोलिसांना फारशी माहिती दिलेली नाही. मात्र, पोलिसांचा प्राथमिक अंदाज असाच आहे की, दोघांवरील संशयामुळेच त्याने हत्येसारखं भयंकर पाऊल उचललं. त्यामुळे आता हत्येचं नेमकं कारण काय आहे हे शोधणं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी