भारतात लवकरच बहुचर्चित ' 5 G' सेवा, चाचणीला दूरसंचार विभागाची मंजूरी, चीनी कंपन्यांना ठेवले दूर

लोकल ते ग्लोबल
Updated May 04, 2021 | 18:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

दूरसंचार विभाग आणि भारत सरकारने देशातील दूरसंचार कंपन्यांना ५ जी सेवेच्या चाचणीची परवानगी दिली आहे. चाचणीमध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएल या कंपन्याचा समावेश आहे.

5 G testing begins in India
भारतात ५जी च्या चाचणीला सुरूवात 

थोडं पण कामाचं

  • ५ जी सेवेच्या चाचणीची परवानगी
  • भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएल
  • चीनी कंपन्यांना सारले दूर

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग आणि भारत सरकारने देशातील दूरसंचार कंपन्यांना '५ जी' सेवेच्या चाचणीची परवानगी दिली आहे. या चाचणीची ज्या दूरसंचार कंपन्यांना किंवा टेलिकॉम ऑपरेटरना परवानगी मिळाली आहे, त्यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएल या कंपन्याचा समावेश आहे. या दूरसंचार कंपन्यांनी ओरिजिनल इक्युपमेंट मॅन्युफॅक्चर्स आणि टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स म्हणजेच एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. तर रिलायन्स जिओ इंफोकॉम लि. आपल्या ट्रायल्सची चाचणी स्वत:च्याच तंत्रज्ञानाने करणार आहे.

चीनी कंपन्यांना सारले दूर


दूरसंचार विभागाने हे स्पष्ट केले आहे की त्यांनी चीनच्या कंपन्यांना ५ जी च्या चाचणीपासून दूर ठेवले आहे. याचा अर्थ असा की हुवावे भारतातील ५ जी चाचण्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. सध्या देशात ५ जी सुविधेची मोठी चर्चा असतानाच ही ५जी च्या चाचणीची बातमी समोर आली आहे. मागील काही काळापासून प्रत्येक कंपनी ५ जी सेवेबद्दल बोलते आहे, मात्र सर्वच भारत सरकारच्या आदेशाची वाट पाहात होते.

रिलायन्स जिओने आधीच सांगितले आहे की ते एक स्वदेशी ५जी नेटवर्क विकसित करणार आहेत. जिओचे ५ जी नेटवर्क भारतातच विकसित केले जाणार आहे. तर एअरटेलने हैदराबादमध्ये कमर्शियल नेटवर्कवर एक यशस्वी ५ जी चाचणी झाल्याची माहिती दिली होती. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचे ५ जी नेटवर्क तयार आहे, फक्त सरकारच्या परवानगीची ते वाट पाहात होते.

संपूर्ण भारतात उपलब्ध होणार ५ जी


सध्या सरकारने ५जी चाचणीसाठी दिलेली परवानगी ही सहा महिन्यांच्या कालावधीसाठी आहे. यासाठी उपकरणांची खरेदी आणि त्यांना कार्यान्वित करणे यासाठी २ महिन्यांचा वेळ दिला आहे. सरकारने परवानगी देताना हे स्पष्ट सांगितले आहे की प्रत्येक दूरसंचार कंपनीला शहरी यंत्रणेबरोबरच ग्रामीण आणि निमशहरी भागातही चाचणी करावी लागेल, म्हणजे संपूर्ण देशात ५ जी तंत्रज्ञान उपलब्ध होईल. फक्त शहरी भागांपुरतेच हे मर्यादित राहणार नाही.

स्पेक्ट्रमचा वापर


प्रायोगिक स्पेक्ट्रम हे वेगवेगळ्या बॅंडमध्ये देण्यात येते आहे. यामध्ये मिड बॅंड (३.२ गीगाहर्टझ पासून ३.६७ गीगाहर्टझ), मिलीमीटर वेव्ह बॅंड (२४.२५ गीगाहर्टझ ते २८.५ गीगाहर्टझ) आणि सब-गीगाहर्टझ बॅंड (७००गीगाहर्टझ) यांचा समावेश आहे. दूरसंचार कंपन्यांना ५ जी चाचणीच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या सध्या वापरात असलेल्या स्पेक्ट्रमचादेखील वापर करण्यास परवानगी असणार आहे.

जगातील या शहरांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे ५ जी


मागील १२ महिन्यांमध्ये लॉंच करण्यात आलेल्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये ५ जी कनेक्टिविटीचा वापर करण्यात आला आहे. ही एक महत्त्वाची सुविधा आहे. बजेटमध्ये असणारे स्मार्टफोन आता ५ जीसाठी तयार आहेत आणि ग्राहक याचा वापरदेखील करत आहेत. भारत सरकारने या क्षेत्रातदेखील मेक इन इंडियावर भर दिला आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार ३४ देशांच्या ३७८ शहरांमध्ये ५ जी नेटवर्क उपलब्ध होते आणि तेव्हापासून यात वाढ होते आहे. दक्षिण कोरियाने ८५ शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. तर चीनने ५७ शहरांमध्ये, अमेरिकेने ५० देशांमध्ये आणि इंग्लंडने ३१ शहरांमध्ये ५ जी सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत भारतात या सेवेसंदर्भातील हालचालींना वेग द्यावा लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी