Omicron Cases in India कर्नाटकमध्ये २ तर महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी १ ओमायक्रॉनबाधीत रुग्ण

5 Omicron cases in India कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या ओमायक्रॉनची बाधा झालेले पाच रुग्ण भारतात आढळले आहेत. यापैकी दोन जण कर्नाटकमध्ये तर महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यांमध्ये प्रत्येकी एक जण आढळला आहे. सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली.

5 Omicron cases in India
कर्नाटकमध्ये २ तर महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी १ ओमायक्रॉनबाधीत रुग्ण 
थोडं पण कामाचं
  • कर्नाटकमध्ये २ तर महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत प्रत्येकी १ ओमायक्रॉनबाधीत रुग्ण
  • सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे
  • रुग्णांवर उपचार सुरू

5 Omicron cases in India नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या ओमायक्रॉनची बाधा झालेले पाच रुग्ण भारतात आढळले आहेत. यापैकी दोन जण कर्नाटकमध्ये तर महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्ली या तीन राज्यांमध्ये प्रत्येकी एक जण आढळला आहे. सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली. ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कर्नाटकमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनबाधीत रुग्णांपैकी एकाचे वय ६६ वर्षे आहे. हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. तो २० नोव्हेंबर २०२१ रोजी बंगळुरू विमानतळावर आला. तिथे त्याची चाचणी झाली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्याला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याला क्वारंटाइन केले. त्याची काही दिवसांनी एका खासगी लॅबमध्ये केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. यानंतर २७ नोव्हेंबर रोजी तो विमानाने दुबईला निघून गेला.

कर्नाटकमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉनबाधीत दुसऱ्या रुग्णाचे वय ४६ वर्षे आहे. हा डॉक्टर आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झाले होते. अलिकडच्या काळात त्याने परदेश दौरा केलेला नाही. यामुळे कोणाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला ओमायक्रॉनची बाधा झाली हे शोधण्यासाठी प्रशासन 'ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग' या पर्यायांचा वापर करत आहे. डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. या रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे की नाही याची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गुजरातमध्ये जामनगर येथे एक ओमायक्रॉनबाधीत आढळला आहे. हा ७२ वर्षांचा नागरिक झिम्बाब्वे येथून आला आहे. तो अनेक वर्षे तिथेच वास्तव्यास होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. 

महाराष्ट्रात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत एक ओमायक्रॉनबाधीत आढळला आहे. महाराष्ट्रातला ओमायक्रॉनची बाधा झालेला तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईत आला. तरुणाला २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सौम्य ताप आला. अद्याप या तरुणात इतर कोणीतीही लक्षणे आढळली नाही. तरुणावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये मरिन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. रुग्णाचे वय ३३ वर्षे एवढे आहे. त्याने अद्याप कोरोना प्रतिबंधक लसचा एकही डोस घेतलेला नाही. 

भारतात आढळलेल्या ओमायक्रॉनबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर काहींच्या चाचण्यांचे अहवाल यायचे आहेत. विषाणूत बदल होणे ही नैसर्गिक बाब आहे. यामुळे घाबरून जाण्याऐवजी पात्र नागरिकांनी नियमानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे तसेच सर्वांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे; असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. 

आतापर्यंतच्या संशोधनानुसार, ज्यांना ओमायक्रॉनची बाधा झाली त्यांच्यात आढळलेली कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला तरी तो धोकादायक नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हा अगदी प्रारंभीचा निष्कर्ष आहे. तज्ज्ञ या विषाणूबाबत आणखी संशोधन करत आहेत. महिन्याभरात आणखी नेमकेपणाने याबाबतची माहिती हाती येईल. ओमायक्रॉन बाबत आणखी माहिती हाती येईपर्यंत लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टंस राखणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे हेच नागरिकांना शक्य आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी