5 terrorist killed in jammu kashmir in 48 hours : श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये ४८ तासांत ५ दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा पथके यशस्वी झाली. पोलिसांनी सुरक्षा पथकांच्या कारवायांबाबत सविस्तर माहिती दिली.
एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये हात असलेल्या इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीर या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला रविवारी अनंतनाग येथे सुरक्षा पथकांनी ठार केले. हा दहशतवादी मूळचा कदीपोरा अनंतनाग येथील रहिवासी आहे. त्याचे नाव फहीम असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (Inspector General of Police - IG or IGP) विजय कुमार यांनी दिली. बिजबेहरा येथे एएसआय मोहम्मद अश्रफ यांची हत्या झाली होती. या हत्येमध्ये फहीमचा हात होता; असे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले.
याआधी शनिवारी शोपियां जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी आणि पुलवामा जिल्ह्यात बंदी घातलेल्या अंसार गजवत-उल-हिंद दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. शोपियां जिल्ह्यात चौगाम गावाच्या हद्दीत चकमक झाली. तर पुलवामा जिल्ह्यात त्रालमधील हरदुमीर येथे चकमक झाली. शनिवारी ठार झालेल्या चार पैकी दोन दहशतवाद्यांची नावं अनुक्रमे नदीम आणि रसूल उर्फ आदिल असल्याचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.
शोपियां जिल्ह्यातील चकमकीत ठार झालेले अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी होते तसेच काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देऊन दहशतवादी संघटनांमध्ये भरती करुन घेण्याचेही काम करत होते. शनिवारी ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण आयइडी (Improvised explosive device) तज्ज्ञ होता; अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.