Bridge Collapse: 'हे' आहेत भारतातील सर्वात भयानक पूल दुर्घटना

Bridge Collapse History: गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेनंतर येथील प्रशासनाबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. पण भारतात आजवर अनेक भयंकर पूल दुर्घटना घडल्या आहेत. त्याचविषयी जाणून घेऊया सविस्तरपणे.

7 worst bridge accidents in indias history
Bridge Collapse: 'हे' आहेत भारतातील सर्वात भयानक पूल दुर्घटना   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मोरबी पूल दुर्घटनेत 141 जणांचा हकनाक बळी
  • देशात घडल्या आहेत अनेक पूल दुर्घटना
  • सावित्री पूल दुर्घटनेने हादरलेला महाराष्ट्र

मुंबई: गुजरातमधील मोरबी नदीवरील पूल दुर्घटनेने (Morbi Bridge Collapse) आतापर्यंत 141 जणांचा हकनाक बळी घेतलाय. सरकारी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि कोडगी वृत्ती यामुळे पूल दुर्घटनेत (Bridge Collapse) निष्पापांना आपले जीव गमवावा लागला. पण ही काही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत देशात अनेकदा अशा पूल दुर्घटना घडल्या आहेत. त्याचविषयी आपण जाणून घेऊया सविस्तरपणे... (7 worst bridge accidents in indias history)

गुजरातमधील मोरबी येथील लच्छू नदीवर बनविण्यात आलेला झुलता पूल 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अचानक कोसळला, ज्यामध्ये आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. नूतनीकरणानंतर अवघ्या 5 दिवसांपूर्वी हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात आला होता.

प्रत्यक्षदर्शी मते, मृतांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून 177 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अशा प्रकारच्या दुर्घटनेत हकनाक बळी जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. निष्काळजीपणामुळे पुलाच्या अपघातात अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला आहे. अशाच दुर्घटनांविषयी जाणून घेऊयात सविस्तर.

अधिक वाचा: Road Accident: भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 14 ठार तर 40 जखमी

सावित्री नदीवरील पूल दुर्घटना (महाराष्ट्र, 2016) 

2 ऑगस्ट 2016 रोजी रात्री उशिरा मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल अचानक कोसळला. ज्यामध्ये डझनभर गाड्या वाहून गेल्या आणि ज्यामध्ये 41 हून अधिक जणांचे मृतदेह सापडले होते. मात्र, मृतांचा आकडा हा खूप मोठा असण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती. कारण या अपघातनंतर अनेकांचे मृतदेहच सापडले नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी दावा केला होता. या अपघातात सुमारे डझनभर वाहने नदीत कोसळली होती. ज्यामध्ये एसटी बसचाही समावेश होता. 

एल्फिन्स्टन स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरी (मुंबई, 2017)

29 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईतील एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी) रेल्वे स्थानकावरील अरुंद फूटओव्हर ब्रिज मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होऊन तब्बल 29 प्रवाशांना आपला हकनाक जीव गमवावा लागला होता.

CSMT पादचारी पूल दुर्घटना ( मुंबई, 2019)
 
14 मार्च 2019 रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरील पादचारी पूल अचानक कोसळला. ज्यामध्ये किमान 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 जण जखमी झाले होते.

अधिक वाचा: Fatehpur। रेल्वेचा भीषण अपघात !, मालगाडीचे 29 डबे रुळावरून घसरले, वंदे भारतसह १२ गाड्या डायवर्ट

कदलुंदी नदी पूल दुर्घटना (केरळ, 2001)

2001 साली केरळमध्ये कदलुंदी नदीवरील रेल्वे पूल दुर्घटनेत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या या अपघातात सुमारे 300 लोक जखमी झाले होते तर तब्बल 57 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही ट्रेन केरळमधील कोझिकोडजवळ कदलुंदी नदीवरील पुल क्रमांक 924 ओलांडत होती. त्यावेळी ट्रेन अचानक रुळावरून घसरली होती. ज्यात मोठी जीवितहानी झाली होती. 

भागलपूर दुर्घटना (बिहार, 2006)

डिसेंबर 2006 साली हावडा जमालपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसवर 150 वर्षे जुना ओव्हर ब्रिज कोसळला होता. या घटनेत सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला होता.

कोटा चंबळ ब्रिज (राजस्थान, 2009)

डिसेंबर 2009 मध्ये, राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील चंबळ नदीवरील एक बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला होता. ज्यामध्ये  ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तब्बल 28 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकल्पाच्या प्रभारी हुंडई आणि गॅमनच्या 14 अधिकार्‍यांवर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक वाचा: बांगलादेशला सितरंग चक्रीवादळाचा तडाखा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील 4 राज्यांना अलर्ट

कोलकाता फ्लायओव्हर (पश्चिम बंगाल, 2016)

31 मार्च 2016 रोजी कोलकाता येथेबी बांधकाम सुरु असलेल्या विवेकानंद उड्डाणपूल कोसळला ज्यामध्ये 27 जणांना प्राण गमवावे लागले होते आणि सुमारे 80 जण जखमी झाले होते. याप्रकरणी  आयव्हीआरसीएल या कन्स्ट्रक्शन फर्मविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासारख्या देशात अनेक पूल दुर्घटना घडल्या आहेत. ज्यामुळे देशातील निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. पण ही कोडगी प्रशासन व्यवस्था ढिम्म हलत नाही.. हेच तुमचं-आमचं दुर्दैव आहे.. पण यापुढे अशा दुर्घटना होऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासनाला सद्बुद्धी येवो ही एक ईश्वरचरणी प्रार्थना!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी