भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू 

कोरोनाची लागण झालेल्या एका ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची देशातील पहिली घटना समोर आली आहे.

भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू (प्रातिनिधिक फोटो)
भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

बंगळुरु: देशात कोरोना व्हायरस पसरत असताना त्यात आता कर्नाटकमध्ये या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे देशात झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील रहिवासी असलेल्या एका ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याला कोरोना व्हायरासची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. दरम्यान, आता या  वयोवृद्ध व्यक्तीच्या संपर्कात किती लोक आले होते याचाही शोध घेतला जात आहे.

मंगळवारी रात्रीच या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता याचं नेमकं कारण समजू शकलेलं नव्हतं. नंतर त्याचे काही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, ज्याचा आता रिपोर्ट आला आहे. ज्यामध्ये स्पष्ट झालं आहे की, त्याचा मृत्यू हा कोरोना व्हायरसमुळे झाला. दरम्यान, हा वयोवृद्ध व्यक्ती काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या दौर्‍यावरुन परत आला होता. तो जानेवारीत सौदी अरेबियात गेला होता आणि २९ फेब्रुवारीला परत आला होता. त्यानंतर त्याला ताप आला होता. त्यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

घाबरुन जाऊ नये, पण नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी: मुख्यमंत्री

दरम्यान,  महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टूर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी. असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी