Cow Lovers : मुक्या प्राण्यांशी (Pets) लळा लागणं हे मानवी स्वभावाचं मूलभूत लक्षण मानलं जातं. आपल्या घरी पाळलेली गाय, म्हैस, कुत्रा, मांजर यासारखे प्राणी हे माणसांना चांगलाच लळा लावत असतात. काही वर्षं हे प्राणी आपल्यासोबत राहतात आणि त्यानंतर जगाचा निरोप घेतात. जवळपास सर्वच पाळीव प्राण्यांचं आयुष्य हे माणसापेक्षा कमी असल्यामुळे माणसासोबत केवळ काहीच वर्षांचा काळ ते एकत्र घालवू शकतात आणि नंतर मरण पावतात. आपल्या जवळचा प्राणी जगातून निघून गेल्याचं दुःख अनेकांना सहन होत नाही. जणू काही आपल्या कुटुंबातील एखादा सदस्यच वारल्याप्रमाणे दुःख माणसांना होतं आणि त्याप्रमाणेच त्या प्राण्याचे अंत्यसंस्कार करावेत, असं अनेकांना वाटतं. सध्या एका गायीच्या मृत्यूनंतर (Death Of Cow) तिचे अंत्यसंस्कार कऱणारं एक कुटुंब चर्चेत आलं आहे.
ही घटना आहे मध्यप्रदेशाच्या निमच नावाच्या गावातील. इथं राहणाऱ्या नरेश गुर्जर नावाच्या गृहस्थांनी 14 वर्षांपूर्वी गायीचं एक वासरू घरी आणलं होतं. त्याचं नाव गौरी असं ठेवण्यात आलं. गौरी गाय हळूहळू मोठी होऊ लागली आणि कुटुंबातील एक सदस्यच बनून गेली. घरातील सर्वांनाच तिचा लळा लागला होता. कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणेच तिची काळजी घेतली जात होती. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी तिला चारा आणि पशुखाद्य देणं, वेळोवेळी तिचं मलमूत्र साफ करणं, तिच्या गोठ्याची साफसफाई करणं, सणावाराला आपल्यासाठी केलेल्या जेवणाचा एक भाग नैवेद्य म्हणून तिला देणं अशी सगळी गायीची सरबराई सुरू होती. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच ती एक मैत्रीण झाली होती आणि येताजाता तिच्या साथीनं सर्वांचं आयुष्य सुरू होतं.
अधिक वाचा - भारत ३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करणार अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन?
गाय घरी येऊन आता 14 वर्षं उलटून गेली होती. एवढ्या वर्षात गाय म्हातारी झाली आणि तिची तब्येत सारखी सारखी बिघडू लागली होती. मात्र तरीही गुर्जर कुटुंबीयांनी तिला विकून टाकलं नाही किंवा सोडूनही दिलं नाही. अखेरच्या श्वासापर्यंत तिचा सांभाळ करण्याचं त्यांनी ठरवलं आणि घरातील ज्येष्ठ नागरिकाप्रमाणे तिची काळजी घेत राहिले. मात्र निसर्गनियमानुसार काही दिवसांतच गायीने प्राण सोडले आणि ती मृत्युमुखी पडली. या घटनेनं पूर्ण कुटुंब दुःखी झालं आणि त्यांनी 4 दिवस सूतक पाळण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा - OBC Reservation : ओबीसी आरक्षणाची सुनावणी पाच आठवडे पुढे ढकलली
एखाद्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करावेत, तसे गायीचे अंत्यसंस्कार कुटुंबीयांनी केले. तिला घराच्या परिसरातच दफन करण्यात आलं आणि 4 दिवस सूतक पाळण्यात आलं. त्यानंतर चार दिवसांनी काही वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणांना बोलावून गायीच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी काही विधी करण्यात आले. त्याचवेळी 1100 ब्राह्मणांना भोजन देऊन मनाचं समाधान करून घेण्याचा प्रयत्न गुर्जर कुटुंबीयांनी केला.