Bangladeshi Women Arrested | बंगळुरू : फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफ इंडिया (FRRO) च्या माहितीच्या आधारे कर्नाटक पोलिसांनी १५ वर्षांपासून भारतात हिंदू म्हणून राहणाऱ्या २७ वर्षीय बांगलादेशी स्थलांतरित महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. रॉनी बेगम असे या बांगलादेशी महिलेचे नाव आहे. तिने तिचे नाव बदलून पायल घोष असे ठेवले आणि नितीन कुमार या मंगळुरू येथील डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह व्यक्तीशी लग्न केले. (A Bangladeshi woman who had been living as a Hindu in India for 15 years has now been arrested by the police).
अधिक वाचा : मुंबईकरांना 900 एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसची भेट
सध्या तिचा पती नितीन फरार आहे. पोलिसांनी फरार नितीनचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर महिलेला अटक करण्यात आली. रॉनी बेगम वयाच्या १२ व्या वर्षी भारतात आली आणि नंतर तिने मुंबईतील डान्स बारमध्ये डान्सर म्हणून काम केले. तिने तिचे नाव बदलून पायल घोष असे ठेवले आणि तिने ती बंगाली असल्याचा दावा केला आहे.
अधिक वाचा : भैय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी तिघे दोषी
ती बंगळुरूत आली त्यावेळी ती नितीनच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर ते २०१९ मध्ये बंगळुरूच्या अंजनानगर भागात राहू लागले. रॉनी शिंपी म्हणून काम करायची. मुंबईत असताना या जोडप्याला पॅनकार्ड मिळवण्यात यश आले होते आणि नितीनला बंगळुरूमधील त्याच्या मित्राच्या मदतीने आधार कार्ड बनवण्यात यश आले होते. रॉनीने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी बांगलादेशला जाण्याचा निर्णय घेतला होता. ती कोलकात्याला गेली आणि तिथून तिने ढाका गाठण्याचा बेत आखला. मात्र इमिग्रेशन अधिकाऱ्यांना तिच्या पासपोर्टची कागदपत्रे संशयास्पद वाटल्याने ती जप्त केली. नंतर तपासात ती अवैध स्थलांतरित असल्याचे उघड झाले.
तोपर्यंत ती बंगळुरूला परतली होती. एफआरआरओने बंगळुरू पोलिस आयुक्तांना रॉनीबद्दल माहिती दिली. याप्रकरणी ब्यादरहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डीसीपी पश्चिम संजीव पाटील म्हणाले की, पॅनकार्ड, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र मिळवण्यात मदत करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मुंबई, कोलकत्ता आणि देशाच्या इतर भागात देखील शोध सुरू केला आहे.