दिल्लीचे तख्त बदलण्यासाठी पवारांची मोट बांधणी; आज शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत 15 पक्षांची बैठक

येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

A meeting of 15 parties under the leadership of Sharad Pawar today
दिल्लीचे तख्त बदलण्यासाठी पवारांची मोट बांधणी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आज दिल्लीत होणार
  • प्रशांत किशोर यांच्यासोबत शरद पवारांची दोनदा बैठक
  • तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्ष गैरहजर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली : येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 15 पक्षांच्या नेत्यांसमवेत आज दुपारी 4 वाजता एक बैठक घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी शरद पवार यांची पुन्हा भेट घेतली होती. 

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यसमितीचीही बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. त्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांशी शरद पवार चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम आजपासून शरद पवार करणार आहेत.
दरम्यान, पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यानंतर दिल्लीत झालेल्या शरद पवार आणि शरद पवार यांची बैठक दोन तास चर्चा झाली. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत मोदी सरकारला शह देण्यासाठी प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचा विचार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला होता. त्याची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री आणि तृमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

यशवंत सिन्हा यांच्या नावाने निमंत्रणे

तीन वर्षांनी होणारी लोकसभा निवडणूक तसेच पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा एकजुटीने मुकाबला करण्यासाठी तिसरी आघाडी उभारण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी माजी अर्थमंत्री व पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पुढाकार घेतला आहे.
पंतप्रधान मोदींचे कट्टर विरोधक यशवंत सिन्हा यांनी सन २०१८ मध्ये ‘राष्ट्रमंच’ची स्थापना केली. आज होणाऱ्या बैठकीसाठी ‘राष्ट्रमंच’च्या वतीनेच सर्व पक्षांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. शरद पवार आणि यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली ही मंगळवारची बैठक होणार आहे. 

१५ पक्षांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह

‘शरद पवार आणि यशवंत सिन्हा हे विद्यमान राष्ट्रीय परिस्थितीवर विचारविनिमय करणार आहेत. या बैठकीस आपली उपस्थिती आणि सहभाग असावा यासाठी यशवंत सिन्हा यांच्याकडून हे अगत्याचे अावतण’ अशा आशयाची निमंत्रण पत्रिका राष्ट्रमंचच्या वतीने विविध राजकीय पक्षांना धाडली गेली अाहे. मात्र नेमके किती पक्ष या बैठकीला हजेरी लावतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

द्रमुक पण नसणार बैठकीत 

तृणमूलच्या वतीने यशवंत सिन्हा, राष्ट्रीय जनता दल नेते मनोज झा, आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विवेक तनखा आणि कपिल सिब्बल यांनाही निमंत्रणे धाडण्यात आली आहेत, मात्र सिब्बल यांनी निमंत्रण नाकारल्याचे सांगितले जाते. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकलाही बैठकीस आमंत्रण दिले मात्र द्रमुकने अंग काढून घेतले आहे.

शिवसेना, काँग्रेसला निमंत्रण नाही

राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सहकारी पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांना या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. केंद्रात यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, अशी वारंवार मागणी शिवसेनेने केली होती हे उल्लेखनीय. दरम्यान,बैठकीला निमंत्रण नसल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. कुणालाही बैठक बोलावण्याचा लोकशाहीत हक्क आहे, परंतु देशात काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगितले. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. तिसरी आघाडी उद्यास आली तर काँग्रेसच्या नेतृत्त्वात सुरू झालेले युपीएचे विसर्जन होणार का, याबाबतही आता तर्क काढले जात आहे. 

संभाव्य तिसऱ्या आघाडीतील पक्षांचे लोकसभेतील विद्यमान बलाबल

द्रमुक 24
तृणमूल काँग्रेस22
राष्ट्रवादी काँग्रेस 05
समाजवादी पार्टी05
आम आदमी पार्टी01
माकप03

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी