इंदूर: वेगाची क्रेझ की एक डुलकी... मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या भीषण बस अपघातातून एक गोष्ट स्पष्ट होते की, मानवी चुकांमुळे काही जणांना हकनाक शिक्षा मिळते... असंच काहीसं आज मध्यप्रदेशमध्ये घडलं.. महाराष्ट्र रोडवेजची एक बस ही थेट नर्मदा नदीत कोसळली.. बसची धडक एवढी जोरदार होती की, भक्कम रेलिंगही बसला खाली पडण्यापासून रोखू शकली नाही. आधी बस दगडावर आपटली त्यामुळे या अपघाताचा आघात अनेक पटींनी वाढला आणि अनेकांना जीव गमवावा लागला.
बसमध्ये एकूण 50 ते 60 लोक होते.आतापर्यंत या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी 5 ते 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच खासदार शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, 'आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.'
अपघाताच्या वेळी नदीचा प्रवाह वेगवान होता... 30 ते 35 जण प्रवाहात वाहून गेल्याची भीती प्रशासनाला आहे. वाहून गेलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. त्यासाठी NDRF आणि SDRF च्या तुकड्या या बचाव कार्य करत आहेत.
ही बस महाराष्ट्र सरकारची असून ती इंदूरहून पुण्याकडे जात होती. दुसऱ्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या कारला वाचवताना हा अपघात झाल्याचा दावा काही लोकांकडून केला जात आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रशासनाचे संपूर्ण लक्ष हे सध्या बसमधून नदीमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधावर आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, इंदूरहून महाराष्ट्राकडे जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट खाली नदीत पडली. धामनोद पोलीस आणि खलटाका पोलीस हे तात्काळ घटनास्थळी बचावकार्यासाठी पोहचले होते. तसेच इंदूरचे आयुक्त पवन कुमार शर्मा यांनी धार आणि खरगोनच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले होते.
इंदूरला महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलावर अपघात
आग्रा-मुंबई (एबी रोड) महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदूरला महाराष्ट्राला जोडतो. घटनास्थळ इंदूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. संजय सेतू पूल ज्यावरून बस पडली तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. अर्धा भाग खलघाट (धार) मध्ये आणि अर्धा भाग खलटाका (खरगोन) मध्ये आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत.