अत्याचाराचा कळस... राजस्थानमधील या महिलेवर वारंवार झाला सामूहिक बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 13, 2020 | 15:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

राजस्थानमधील पोलिसांनी एका तीन वर्षांपूर्वीच्या अपहरणाच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणाबाबत तपास करत असताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती आली आहे.

A woman abducted and sold for three times
अत्याचाराचा कळस... राजस्थानमधील या महिलेवर वारंवार झाला सामूहिक बलात्कार  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राजस्थानमधील पोलिसांनी एका तीन वर्षांपूर्वीच्या अपहरणाच्या प्रकरणाचा छडा लावला आहे.
  • फिरोजाबादमधील एका महिलेच्या अपहरणाबाबत चौकशी करताना तिच्यासोबत घडलेल्या दुष्कर्मांची शृंखलाच पोलिसांसमोर आली आहे.
  • दोन मुलांची आई असलेल्या या महिलेचे आधी अपहरण केले गेले आणि त्यानंतर तिला तीन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना विकले गेले.

नवी दिल्ली: राजस्थानमधील पोलिसांनी एका तीन वर्षांपूर्वीच्या अपहरणाच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणाबाबत तपास करत असताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती आली आहे. फिरोजाबादमधील एका महिलेच्या अपहरणाबाबत चौकशी करताना तिच्यासोबत घडलेल्या दुष्कर्मांची शृंखलाच पोलिसांसमोर आली आहे. दोन मुलांची आई असलेल्या या महिलेचे आधी अपहरण केले गेले आणि त्यानंतर तिला तीन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना विकले गेले.

द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे लग्न आग्रा इथे झाले होते. जेव्हा ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती, तेव्हाच २०१७मध्ये तिचे अपहरण झाले होते. ११ फेब्रुवारीच्या रात्री या २२ वर्षीय महिलेच्या हाती एक फोन लागला आणि तिने थेट तिच्या वडिलांना संपर्क साधला आणि सर्व हकीकत सांगत तिचे लोकेशनही कळवले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कंचनपुरा पोलिसांशी संपर्क साधला.

कंचनपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला सात महिन्यांच्या मुलासोबत सोडवण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाच्या चौकशीनंतर या महिलेला तीन वेळा विकले गेल्याचे पोलिसांसमोर आले. तसेच तिच्यावर सतत सामूहिक बलात्कार केला गेला. सर्वात धक्कादायक म्हणजे यादरम्यान तिने जन्म दिलेल्या तिच्या २ वर्षाच्या मुलीलादेखील या नराधमांनी बालविवाहाच्या नावाखाली विकले.

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार ओमवती, भोलाराम, देवी सिंह, पप्पू गुर्जर, प्रेम सिंह, रामदीन, भूपिंदर, रामनाथ आणि दीना यांच्याविरोधात मानव तस्करी, सामूहिक बलात्कार, अपहरण आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे अपहरण ओमवती, भोलाराम आणि देवी सिंह यांनी केले होते. त्यांनी केवळ ५० हजार रूपयांसाठी तिला पप्पू गुर्जर याला विकले होते. पप्पूने जवळपास १ वर्ष महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले, जिथे तिचा सातत्याने बलात्कार केला गेला. याचवेळी भूपिंदर, रामनाथ आणि दीना यांनीही तिच्यावर सातत्याने सामूहिक बलात्कार करत तिचा छळ केला.

पप्पूसोबत असताना ही महिला गर्भवती होती. सात महिन्याची गर्भवती असताना त्याने महिलेला प्रेम सिंह याला ७० हजार रूपयांना विकले. त्यानंतर या महिलेने एका मुलीला जन्म दिला. प्रेम सिंह यानेदेखील तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर ती पुन्हा गर्भवती राहिली आणि एका मुलाला जन्म दिला.

या महिलेवर अत्याचार करून या नराधमांना समाधान झाले नाही म्हणून त्यांनी तिच्या दोन वर्षाच्या मुलीलाही एका व्यक्तीला दोन लाख रूपयांसाठी विकले आणि त्याचदरम्यान ते पुन्हा या महिलेला रामधीन याला विकणार होते. यादरम्यान महिलेच्या हाती एक फोन लागल्यावर तिने तातडीने आपल्या कुटुंबियांना संपर्क साधला आणि इतकी वर्षे सुरू असलेल्या या अत्याचाराबाबत माहिती दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी