Taliban Rule : सार्वजनिक ठिकाणी हसल्याबद्दल तरुणीला तालिबानी शिक्षा, सरकारच्या वर्षपूर्तीनंतर परिस्थिती अधिकच बिकट

तालिबान सरकार सत्तेवर आल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात अफगाणिस्तानची परिस्थिती अधिकच बिकट झाली असून मुली आणि महिलांवरील बंधने वाढत चालली आहेत.

Taliban Rule
सार्वजनिक ठिकाणी हसल्याबद्दल तरुणीला तालिबानी शिक्षा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तालिबान सरकारचा तालिबानी कारभार सुरूच
  • सार्वजनिक ठिकाणी हसल्याबद्दल तरुणीला शिक्षा
  • मुलींच्या शिक्षणावर वाढती बंधनं

Taliban Rule : सार्वजनिक ठिकाणी (Public Place) इतर तरुणींसोबत बोलताना मोठ्याने हसल्याबद्दल एका तरुणीला तालिबानी शिक्षेला (Talibani Punishment) सामोरं जावं लागलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्याच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभराच्या कारभारात तालिबान सरकारने देशातील महिलांवर बंधनं घातली असून त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्णपणे बंद करून टाकलं आहे. महिलांना घराबाहेर पडण्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी हसण्यापर्यंत अनेक गोष्टींवर आता बंधनं कडक झाली आहेत. अफगाणिस्तानमध्ये अनेक ठिकाणी महिलांना त्यांच्या वागणुकीबद्दल शिक्षा देण्याच्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे. 

तरुणीला मिळाली शिक्षा

नुकतीच एका तरुणीला अफगाणिस्तानमध्ये शिक्षा देण्यात आली. या तरुणीचा दोष फक्त इतकाच होता की सार्वजनिक ठिकाणी ती तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारताना मोठ्याने बोलली आणि त्यानंतर हसली. तालिबानी कायद्यात या दोन्ही गोष्टींना बंदी आहे. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी लक्ष वेधून घेण्यासारखं कृत्य करू नये, असं तालिबानी फतव्यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे या तरुणीला तालिबानी पुरुषांकडून मारहाण करण्यात आली. ही तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत एका कपड्याच्या दुकानात गेली होती. त्या ठिकाणी कपड्यांची निवड करताना या दोघी एकमेकींशी बोलत होत्या. कपड्यांवर एकीने काहीतरी विनोद केला आणि त्याला दुसरीने हसून प्रतिसाद दिला. हे पाहताच आजूबाजूचे तालिबानी पुरुष खवळले आणि त्यांनी या तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

अधिक वाचा - खाटूश्यामजी जत्रेत चेंगराचेंगरी; मंदिराचे दरवाजे उघडताच घडली घटना, 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू

तरुणीने विचारला जाब

आपल्या मैत्रिणीसोबत कपडे खरेदी करताना बोलणं साहजिक आहे, असा या तरुणीचा दावा आहे. न बोलता एकत्र खरेदी करायची तरी कशी, असा सवाल तिने केला आहे. यापूर्वीही महिलांवर अशाच प्रकारे अन्याय झाल्याचा दावा तिने केला आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणीला तिच्या सलवारवरून जमावाने मारहाण केली होती. तिची सलवार प्रमाणापेक्षा जास्त टाईट असल्याचा आरोप करत काही तरुणांनी तिला भर रस्त्यात मारहाणा केली होती. 

अधिक वाचा - Breaking News 08 August 2022 Latest Update: गेल्या 24 तासात देशात 16 हजार 167 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

बाहेर पडण्यावर बंधनं

तालिबान सरकारनं सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीला महिलांबाबत सबुरीचं धोरण राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र हळूहळू महिलांवरील बंधनं कडक करण्यात आली असून महिलांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महिलांना घराबाहेर पडायचं असेल, तर सोबत घरातील कुणीही पुरुष असणं गरजेचं आहे. एकटी महिला घरापासून लांबचं अंतर पार करू शकत नाही. त्याशिवाय महिलांना घराबाहेर पडताना बुरखा घेणंही बंधनकारक आहे. महिलांच्या शिक्षणावर कुठलीही मर्यादा येणार नाही, अशी भाषा करणाऱ्या तालिबाननं आता मात्र केवळ प्राथमिक शिक्षणापुरतीच परवानगी दिली आहे. मुली माध्यमिक शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या मुलींवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे अनुभव अनेकींनी व्यक्त केले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी