नलक्षवाद्यांच्या तावडीतील जवानाची सुखरुप सुटका

छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी एका कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. या कमांडोची नक्षलवाद्यांनी सुखरुप सुटका केली.

abducted crpf commando released by naxals
नलक्षवाद्यांच्या तावडीतील जवानाची सुखरुप सुटका  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • नलक्षवाद्यांच्या तावडीतील जवानाची सुखरुप सुटका
  • सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात ३ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमामध्ये झालेली चकमक
  • २२ जवानांनी दिलेले बलिदान आणि एका कोब्रा कमांडोचे झाले होते अपहरण

नवी दिल्ली: छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी एका कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. या कमांडोची नक्षलवाद्यांनी सुखरुप सुटका केली. नक्षलवाद्यांच्या तावडीतून कोब्रा कमांडो सुटल्यामुळे संबंधित जवानाच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. abducted crpf commando released by naxals

सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात ३ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमामध्ये चकमक झाली होती. या चकमकीत २२ जवानांनी बलिदान दिले. एक कोब्रा कमांडो बेपत्ता झाला होता. हा कमांडो ताब्यात असल्याचे नक्षलवाद्यांनी काही तासांनंतर जाहीर केले होते. कोब्रा कमांडोने नोकरी सोडण्याची तयारी दाखवली तर त्याला सोडून देऊ अशी अट नक्षलवाद्यांनी घातली होती. ही अट मान्य झाली की नाही हे समजले नाही मात्र कोब्रा कमांडोची सुखरुप सुटका झाली. 

नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या कोब्रा कमांडोचे नाव राकेश्वरसिंह मनहास असे आहे. हा जवान जम्मूतील उधमपूरचा रहिवासी आहे. सीआरपीएफच्या कोब्रा कमांडो पथकात तो कार्यरत आहे. नक्षलवाद्यांनी अचानक त्याची सुटका कशी केली हे अद्याप समजलेले नाही. मात्र त्याच्या सुटकेनंतर नातलगांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांचे आभार मानले. मनहासच्या उधमपूरमधील घरात आनंदाचे वातावरण आहे. 

सुकमाच्या जंगलात नक्षलवादी एका बैठकीसाठी एकत्र येणार असल्याची माहिती मिळाली होती. यात मडवी हिडमा नावाचा एक मोस्ट वाँटेड नक्षलवादीही सहभागी असल्याचे समजले होते. मडवी २०१३ पासून प्रचंड सक्रीय आहे. तो नक्षलवाद्यांच्या एका बटालियनचे नेतृत्व करतो. अनेक मोठ्या हिंसक कारवायांमध्ये त्याचा आणि त्याच्या बटालियनचा हात आहे. त्याच्या बटालियनकडे आधुनिक शस्त्रास्त्रे आणि नेटवर्क जॅमर आहेत. याच कारणामुळे त्याला पकडण्याच्या हेतूने सुरक्षा पथकाने प्रयत्न केला. मात्र सावध नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेतला वेगवेगळ्या दिशांनी एकाचवेळी सुरक्षा पथकावर गोळीबार झाला. 

दोन्ही बाजूने प्रचंड गोळीबार झाला. या धुमश्चक्रीत नऊ नक्षलवादी ठार झाले आणि १५ नक्षलवादी जखमी झाले. नक्षलवाद्यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांना उचलून पळ काढला. जाताना त्यांनी एका कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. मात्र त्याची सुखरुप सुटका झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी