Liquor Bottles inside ATM : एटीएममध्ये कचऱ्याचा ढीग आणि दारुच्या बाटल्या, या प्रसिद्ध अभिनेत्याने अपलोड केलेला VIDEO होतोय व्हायरल

एटीएम सेंटरमध्ये कचऱ्याचा ढीग पडल्याचा आणि डस्टबिनमध्ये रिकाम्या बाटल्या भरल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

Liquor Bottles inside ATM
एटीएममध्ये बाटल्या आणि कचरा  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • पुण्यातील IDBI बँकेच्या एटीएममध्ये कचरा आणि दारुच्या बाटल्या
  • अभिनेता शशांक केतकरने अपलोड केला व्हिडिओ
  • एटीएममधील स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, चर्चा सुरू

Liquor Bottles inside ATM | एटीएम सेंटरमध्ये (ATM Center) प्रवेश केल्यानंतर आजूबाजूला पडलेला प्रचंड कचरा (Waste) आणि शेजारच्या डस्टबिनमध्ये टाकलेल्या दारूच्या बाटल्या (Liquor Bottles) असं दृश्य एका अभिनेत्याला दिसलं. हा प्रकार पाहून न राहवल्याने त्याने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि तिथली सगळी परिस्थिती रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आणि एटीएम सेंटरमध्ये काय परिस्थिती आहे, हे जगाला दाखवून दिलं. सामान्य माणसाला रोजच्या रोज येणारा हा अनुभव एका सेलेब्रिटीने पोस्ट केल्यावर मात्र त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर चाहत्यांनी आपले अनुभवही शेअर करायला सुरुवात केली. 

शशांक केतकरने पोस्ट केला व्हिडिओ

अनेक मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता शशांक केतकरनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शशांक केतकर पुण्यातील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये गेला होता. एटीएमचं दार उघडून त्याने आत प्रवेश केला आणि तिथली परिस्थिती पाहून त्याचा तीळपापड झाला. दररोज हजारो नागरिक ज्या एटीएम सेंटरमध्ये ये-जा करतात, ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी बँकेची नाही का, असा प्रश्न त्याला पडला. त्याने तिथली परिस्थिती मोबाईलवर रेकॉर्ड करून त्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला. बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर चर्चा सुरू झाली.

उपरोधिक मेसेज

ही घटना घडली पुण्यात. त्यामुळे साहजिकच त्यातही काहीतरी उपरोधिक असणं प्राप्तच होतं. शशांक केतकरने हा व्हिडिओ पोस्ट करताना ‘Thank You IDBI’ असा उपरोधिक मेसेज लिहून बँकेचा शक्य तितका उद्धार करण्याचा प्रयत्न केला. हा उपरोध काहींना समजला, काहींच्या डोक्यावरून गेल्याचं दिसलं. एटीएम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कुणाची, हा मुद्दा मग चर्चेच्या अजेंड्यावर आला आणि त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक फॉलोअर्स आपापली मतं मांडू लागले. 

जबाबदारी कुणाची?

एटीएममध्ये स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ही बँकेची आहे, असं बहुतांश फॉलोअर्सनी मत नोंदवलं. बँक जर सेवा देणार असेल, तर त्यांनी स्वच्छतेचीही काळजी आणि जबाबदारी घ्यायला हवी, असं एक युजर म्हणाला. तर अनेक सर्वसामान्य नागरिक एटीएममधून पैसे काढल्यानंतर त्यासोबत रिसीटही घेतात आणि तिथेच ती फाडून टाकतात. प्रत्येकजण असं करायला लागला, तर एटीएममध्ये कचरा होणं स्वाभाविकच नाही का, असा सवालही एकाने उपस्थित केला. एटीएम स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी बँकेची आहे, हे खरं असलं तरी तेवढीच नागरिकांचीही ती जबाबदारी असल्याच्या मुद्द्याकडे एकाने लक्ष वेधलं. 

अधिक वाचा - 3D Operation Successful : 3D प्रिंटिंगचा वापर करून बसवला नवा कान, ऑपरेशन यशस्वी, जगभरातील दिव्यांगांसाठी आशेचा किरण

बाटल्या कुठून आल्या?

पावत्यांचा कचरा एकवेळ समजण्यासारखा आहे, पण एटीएमच्या डस्टबिनमध्ये दारुच्या बाटल्या कशा आल्या, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला. या एटीएमबाहेर सुरक्षारक्षकही गायब असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे काही मद्यपी मध्यरात्रीच्या सुमाराला येऊन एटीएमच्या गारव्याला बसून मद्यमान करत असल्याचा संशय काहीजणांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी