एका रात्रीतून लस उत्पादन वाढवणे शक्य नाही: अदर पूनावालांचे लस उत्पादनावरील वादासंदर्भात स्पष्टीकरण

लोकल ते ग्लोबल
Updated May 03, 2021 | 22:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.अखेर अदर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुनावाला यांनी एक पत्र ट्विट केलं आहे.

Adar Poonawalla's explaination
अदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण 

थोडं पण कामाचं

  • लसीकरणावर अदर पूनावालांची प्रतिक्रिया
  • पूनावाला सध्या लंडनमध्ये
  • धमकी मिळत असल्याचे केले होते वक्तव्य

मुंबई : केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत अखेर अदर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुनावाला यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. नुकताच अदर पूनावाला यांनी आपल्याला देशातील पॉवरफूल व्यक्तींकडून कोविशील्डच्या पुरवठ्यासंदर्भात धमकीचे फोन येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भारतात मोठे वादंग उभे राहिले आहे. पूनावाला सध्या लंडन येथे वास्तव्यास आहेत. मात्र आज पुन्हा त्यांनी ट्विट करत या वादासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. 

लोकसंख्या मोठी, काम अत्यंत अवघड

लस उत्पादन करणे हे एक विशिष्ट काम आहे. एका रात्रीत लसीचे उत्पादन वाढवता येत नाही. भारताची प्रचंड मोठी लोकसंख्या लक्षात घेणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक प्रौढ नागरिकासाठी लशीचे पुरेसे डोस तयार करणे हे सोपे काम नाही. छोट्या लोकसंख्येचे प्रगत देश आणि प्रगत कंपन्यांना देखील सर्व लोकसंख्येसाठी पुरेसे लस उत्पादन करणे शक्य होत नाहीये. हे अतिशय अवघड काम आहे. आम्ही मागील वर्षी एप्रिलपासून भारत सरकारबरोबर एकत्रितरित्या काम करत आहोत. आम्हाला वैज्ञानिक, नियामक संस्था आणि आर्थिक अशा सर्वच पातळ्यांवर सर्व प्रकारचे साहाय्य मिळते आहे, असे अदर पूनावाला यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

पूनावालांचे स्पष्टीकरण


माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्यामुळे मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. सर्व प्रथम, लस उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे रात्रीतून उत्पादन वाढविणे शक्य नाही, असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याला हे देखील समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी पुरेसे डोस तयार करणं हे सोपं काम नाही, असंही पुनावाला म्हणाले.

पुढील काही महिन्यांत ११ कोटी डोसचा पुरवठा


पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी 11 कोटी डोस पुरवल्या जातील. आम्हाला हे समजते की प्रत्येकाला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी असे वाटते. तेही आमचे प्रयत्न आहेत आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असंही पुनावाला यांनी सांगितलं.

आम्हाला आतापर्यंत 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असून त्यापैकी 15 कोटीहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत. भारत सरकारकडून पुढील टप्प्यासाठी पुढील काही महिन्यांत 11 कोटी डोससाठी 1,732.50 कोटी रुपयांची 100 टक्के आगाऊ रक्कमही मिळाली आहे. दुसऱ्या समांतर व्यवस्थेद्वारे आणखी 11 कोटी डोस राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना पुरवण्यात येतील, अशी माहिती पूनावाला यांनी दिली आहे.

कोविड-१९ विरुद्धच्या भारताच्या लढाईला मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे, असेही पुढे पूनावाला यांनी म्हटले आहे.

पूनावाला यांचे ट्विट

अदर पूनावाला हे सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सिरम इन्स्टिट्युट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरम इन्स्टिट्युटकडून कोरोना प्रतिबंधासाठी कोविशील्ड लसीचे उत्पादन करण्यात येते आहे. कोविशील्ड म्हणजेच ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका कोविड-१९ लस.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी