पाकिस्तानच्या २० कोटी रुपयांवर भारी पडला भारताचा १ रुपया!

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 18, 2019 | 18:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

हेग इथं असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू मांडणाऱ्या हरीश साळवे यांची देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा होतेय. जाणून घ्या का होतेय साळवेंची चर्चा...

Kulbhushan Jadhav Case
पाकिस्तानच्या २० कोटी रुपयांवर भारी पडला भारताचा १ रुपया!  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मराठमोळ्या हरीश साळवेंचं होतंय जगभरात कौतुक
  • कुलभूषण जाधव प्रकरणात हरीश साळवेंनी घेतली १ रुपया फी
  • पाकिस्ताननं त्यांच्या वकीलांवर खर्च केले २० कोटी रुपये

नवी दिल्ली: कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये भारताला खूप मोठा विजय मिळाला. या केसचा निकाल आल्यानंतर मराठमोळे वकील हरीश साळवे यांची खूप चर्चा होतेय. हेग इथं झालेल्या सुनावणीत भारताची बाजू ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी मांडली. भारताकडून खूप प्रभावीपणे त्यांनी आपली बाजू मांडली. साळवे यांच्या तर्क-वितर्कांमुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा खोटेपणा उघड झाला. आंतरराष्ट्रीय कोर्टानं साळवे यांच्या युक्तीवादाला १५-१ नं पाठिंबा देत भारताच्या बाजूनं आपला निकाल दिलाय. आयसीजेनं कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द केली असून त्यांना वकिलांची मदत देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले आहेत.

या केसमध्ये जबरदस्त युक्तिवाद करणाऱ्या हरीश साळवे यांची देश-विदेशामध्ये प्रशंसा केली जात आहे. विशेष म्हणजे साळवे यांनी ही केस लढण्यासाठी भारत सरकारकडून अवघ्या १ रुपयाची फी आकारली होती. तर पाकिस्ताननं आपल्या वकिलांच्या टीमवर २० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला.

हरीश साळवे यांच्या या फीबाबत खुलासा दुसरं-तिसरं कुणी नाही तर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी १५ मे २०१७ रोजी केला होता. स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, हेग इथं आयसीजेमध्ये भारताची बाजू मांडण्यासाठी हरीश साळवे यांनी फीच्या स्वरूपात १ रुपया घेतला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार एरवी हरीश साळवे आपल्या कुठल्याही केससाठी एका दिवसाची ३० लाख रुपये फी घेतात. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी आणि एका मराठमोळ्या नागरिकाला वाचविण्यासाठी हरीश साळवे यांनी हे पाऊल उचललं आणि फी १ रुपया घेतली. त्यांच्या या कामगिरीचं प्रत्येक भारतीय कौतुक करतोय.

 

 

पाकिस्तान सरकारनं गेल्यावर्षी आपलं बजेट सादर करतांना कागदपत्र सादर केले होते. यात पाकिस्तान सरकारनं म्हटलं होतं की, हेगमध्ये जाधव केस लढत असलेल्या लंडनचे वकील खवर कुरैशी आणि त्यांच्या टीमला २० कोटी रुपये फी दिली गेलीय. खवर कुरैशी यांनी केंम्ब्रिज विद्यापीठातून ‘लॉ’चं शिक्षण घेतलंय आणि ते आयसीजेमध्ये केस लढणारे सर्वात कमी वयाचे वकील आहेत.

Kulbhushan Jadhav case

आयसीजेमध्ये या केसवर सुनावणी दरम्यान हरीश साळवे यांनी क्रमाक्रमानं पाकिस्तानचा खोटेपणा उघडकीस आणला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या सैनिकी कोर्टानं मानक सुनावणी प्रक्रियेचं पूर्णपणे उल्लंघन केलं. साळवे यांनी आतंरराष्ट्रीय कोर्टात सांगितलं की, पाकिस्ताननं वियना कराराचं उल्लंघन करत जाधव यांचे कायदेशीर अधिकार नाकारले. तसंच त्यांनी सैनिका कोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत दाखवली नाही. परदेशात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला आपल्या दूतावासाकडून वकीलांची मदत कायदेशीरपणे घेता येते, मात्र जाधव केसमध्ये असं घडलं नाही. भारतानं एक-दोन वेळा नाही तर १६ वेळा वकिलांची मदत पोहोचवण्याबद्दल पाकिस्तानला विनंती केली, मात्र इस्लामाबादनं भारताची विनंती नाकारली.

देशातील प्रतिष्ठित वकिलांपैकी एक आहेत हरीश साळवे

हरीश साळवे यांची गणना देशातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकीलांमध्ये केली जाते. ते १९९२ ते २००२ पर्यंत भारताचे सॉलिसिटर जनरल होते. साळवे यांचा जन्म नागपूरला १९५६ मध्ये झाला. त्यांनी कॉमर्स शाखेमध्ये पदवी घेतली आणि नंतर ते सीए झाले. एका रिपोर्टनुसार साळवे पुढे जावून अर्थशास्त्री एन. पालखीवाला यांच्याकडून प्रभावित झाले आणि त्यांनी वकील होण्याचा निर्णय घेतला. साळवे यांनी १९८० साली व्यावसायिकरित्या वकिली सुरू केली. त्यानंतर देश-विदेशातील हाय प्रोफाईल केसेस त्यांनी लढल्या. कृष्णा-गोदावरी बेसिन केसमध्ये त्यांनी मुकेश अंबानी यांच्या बाजूनं केस लढली होती. साळवे यांनी ITC लिमिटेड, टाटा ग्रुप, तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासारख्य हाय-प्रोफाईल केसेस लढलेल्या आहेत. साळवे हे जगातील प्रतिष्ठित आणि महागड्या वकीलांपैकी एक आहेत.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
पाकिस्तानच्या २० कोटी रुपयांवर भारी पडला भारताचा १ रुपया! Description: हेग इथं असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू मांडणाऱ्या हरीश साळवे यांची देशभरात नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा होतेय. जाणून घ्या का होतेय साळवेंची चर्चा...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...