Afghanistan Forest Fire : आग विझवायची कशी असते? तालिबान सरकारपुढे मोठा प्रश्न, दहा दिवसांपासून जंगलात पेटलाय वणवा

आग विझवायची कशी, हा गहन प्रश्न सध्या तालिबान सरकारसमोर आहे. आधुनिक अग्निशमन यंत्रणा नसल्याने जंगलात भडकत चाललेली आग विझवण्यात सरकार अपयशी ठरत आहे.

Afghanistan Forest Fire
अफगाणिस्तानात पेटलाय वणवा  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • अफगाणिस्तानच्या जंगलात पेटलाय वणवा
  • आधुनिक यंत्रणाच नसल्याने आग विझवण्यात अपयश
  • तालिबान सरकार मागणार शेजारी देशांकडे मदत

Afghanistan Forest Fire | अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या दहा दिवसांपासून जंगलाला आग (Fire) लागली असून दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न तालिबान सरकारकडून (Taliban government) सुरू आहेत, मात्र त्यात त्यांना यश येताना दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेली आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी आधुनिक यंत्रणाच सरकारकडे नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

दहा दिवसांपासून भडकली आग

अफगाणिस्तानच्या नूरग्राम परिसरात असलेल्या जंगलात वणवा पेटला आहे. गेल्या 10 दिवसांपासून हा वणवा विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तालिबान सरकारमधील आपत्ती व्यवस्थापन खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, काही फायरफायटर्सच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र या प्रयत्नांना यश येत नसल्याचं चित्र आहे. या फायरफायटर्समध्ये आवश्यक असणारी आधुनिक यंत्रणा नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास वेळ लागत असल्याचं आपत्ती व्ववस्थापन मंत्री जनन साईक यांनी म्हटलं आहे. 

“आम्ही हेलिकॉप्टर्सच्या साहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र ही आग डोंगराळ भागात भडकली असल्यामुळे हेलिकॉप्टर्सना अधिक उंची गाठावी लागत आहे. आमच्याकडे सध्या असलेली हेलिकॉप्टर्स ही एवढी उंची गाठू शकत नाहीत. आम्ही इस्लामिक एमिरेस्ट्सकडे असणारी आधुनिक विमानं पाठवण्याची मागणी केली आहे. मात्र ती विमानंदेखील एवढ्या उंचीवर जाऊन आग विझवू शकतील, असं वाटत नाही. सध्या आम्ही हतबल आहोत”, अशी प्रतिक्रिया मंत्री साईक यांनी दिली आहे. 

शेजारी राष्ट्रांकडे मागणार मदत

आग विझवण्याच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचं लक्षात आल्यावर आता अफगाणिस्तान सरकारडे शेजारी राष्ट्रांची मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे. “आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेतच. मात्र आणखी काही दिवस तर त्यात यश आलं नाही, तर शेजारील राष्ट्रांची मदत मागण्याखेरीज आमच्याकडे पर्याय नाही. शेजारील राष्ट्रांकडे असणारी अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा अफगाणिस्तानला धाडण्याची विनंती करण्यात येईल”, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं माध्यमांना दिली आहे. 

आगीच्या कारणाचा शोध

आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र आतापर्यंत 185 एकर क्षेत्रात ही आग पसरली असून हा सर्व परिसर जळून खाक झाला आहे. नूरग्राम जिल्ह्यातून ही आग आता छापा जिल्ह्यातही पसरत चालली आहे. हे जंगल दोन्ही जिल्ह्यांच्या परिसरात विखुरलं असून या परिसरात जोरदार वारेही वाहत आहेत. 

अनेकांच्या रोजगारावर परिणाम

आगीच्या भल्यामोठ्या लोळांमुळे जंगलाच्या जवळ जाणंही शक्य नसल्याचं स्थानिक सांगत आहेत. अनेकांची रोजीरोटी या जंगलांवर अवलंबून आहे. आपल्या डोळ्यासमोर हे जंगल जळून खाक होत असल्याचं पाहून स्थानिक रहिवाशांना त्यांच्या भवितव्याची चिंता सतावते आहे. सरकारने लवकरात लवकर पावलं उचलून जंगल वाचवावं, अशी त्यांची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी