Action aginst Piyush Jain And Ranu Mishra : समाजवादी पक्षाच्या समर्थकांकडे कोट्यवधींची माया

Perfume Businessman Ranu Mishra : उत्तर प्रदेशमधील कनौजमधून एक मोठी बातमी आली आहे. आयकर विभाग आणि जीएसटी व्हिजिलन्स टीम होली मोहल्ला येथील अत्तराचे व्यावसायिक रानू मिश्रा यांच्या घर आणि कारखान्यात तपासणी करत आहे.

Income Tax Department raids
समाजवादी पक्षाच्या समर्थकांकडे कोट्यवधींची माया 
थोडं पण कामाचं
  • समाजवादी पक्षाच्या समर्थकांकडे कोट्यवधींची माया
  • पीयूष जैन आणि रानू मिश्रांच्या संपत्तीची तपासणी सुरू
  • कोट्यवधींच्या संपत्तीची मोजणी सुरू, आयकर आणि जीएसटी व्हिजिलन्स टीमची कारवाई

Perfume Businessman Ranu Mishra : कन्नौज : उत्तर प्रदेशमधील कनौजमधून एक मोठी बातमी आली आहे. आयकर विभाग आणि जीएसटी व्हिजिलन्स टीम होली मोहल्ला येथील अत्तराचे व्यावसायिक रानू मिश्रा यांच्या घर आणि कारखान्यात तपासणी करत आहे. याआधी कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन आणि त्यांच्या मुलाकडे केलेल्या तपासणीत आयकर विभाग आणि जीएसटी व्हिजिलन्स टीमला कोट्यवधींची माया आढळली. विशेष म्हणजे पीयूष जैन आणि त्यांचा मुलगा तसेच रानू मिश्रा हे समाजवादी पक्षाचे समर्थक आहेत. 

खोटी बिलं तयार करुन कोट्यवधी रुपयांचा जीएसटी भरणे टाळल्याचा आरोप पीयूष जैन आणि त्यांच्या मुलावर आहे. पीयूष जैन आणि त्यांचा मुलगा यांच्या संपत्तीची मोजणी अद्याप सुरू आहे. ही कारवाई सुरू असतानाच रानू मिश्रा यांच्या घर आणि कारखान्यात तपासणी सुरू झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी छापे टाकले त्या सर्वच ठिकाणी सरकारी पथकाने कागदपत्रे छाननीसाठी जप्त केली आहेत. नोटांच्या मोजणीसाठी यंत्र वापरली जात आहेत. 

समाजवादी अत्तर नावाचे अत्तर बाजारात आणल्यामुळे पीयूष जैन चर्चेत आले होते. यानंतर ठोस माहिती घेऊन जीएसटी व्हिजिलन्स टीमने कारवाई केली. ज्यांच्या मालमत्तांची तपासणी सुरू आहे त्यांचा समाजवादी पक्षाशी थेट संबंध नाही, असे सपाकडून सांगण्यात आले. मात्र जीएसटी व्हिजिलन्स टीम सक्रीय झाल्यानंतर समाजवादी पक्षाने कोरोना संकटाचे कारण देत प्रचाराचे मोठे कार्यक्रम तडकाफडकी रद्द केले.

पीयूष जैन आणि त्यांचा मुलगा हे उत्तर प्रदेशमधील मोठे अत्तर व्यावसायिक आहेत. मूळचे कन्नौजचे असलेले पियूष जैन मागील काही वर्षांपासून कानपूरमध्ये स्थायिक आहेत. त्यांच्याकडून अत्तरांचा मोठा साठा नियमितपणे मुंबईत येतो. मुंबईतून अत्तर आखाती देशांमध्ये जाते. प्रामुख्याने सौदी अरेबियात पियूष जैन यांच्याकडून अत्तराची निर्यात केली जाते. पीयूष जैन यांच्या मालकीच्या ४० पेक्षा जास्त कंपन्या आढळल्या आहेत. त्यांच्या दोन कंपन्या आखाती देशांमध्ये आहेत. पीयूष यांच्या मालकीचा पेट्रोल पंप पण आहे. उत्तर प्रदेशमध्ये अत्तर निर्मिती करणाऱ्या पीयूष जैन यांच्या व्यवसायाचे मुख्यालय मुंबईत आहे. मुंबईत त्यांचा एक बंगला पण आहे.

पीयूष जैन आणि त्यांचा मुलगा तसेच रानू मिश्रा यांच्या विरोधात कारवाई सुरू झाल्यापासून उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे समर्थक असलेल्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी