Corona In Parliament : अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या ४०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

Corona virus In Parliament देशात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत असताना आता संसदेतही कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. संसदेतील ४०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे.

थोडं पण कामाचं
  • देशात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे.
  • संसदेतील ४०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण
  • देशात कोरोनाचे एक लाख ५९ हजार रुग्ण आढळले आहेत.

Corona In Parliament : नवी दिल्ली : देशात पुन्हा कोरोनाचे संकट (coroa crisis) वाढत असताना आता संसदेतही (parliament) कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. संसदेतील ४०० कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. ४ ते ८ जानेवारीदरम्यान राज्यसभा सचिवालयायाच्या ६५, लोकसभा सचिवालयाचे २०० आणि इतर सेवेतील १३३ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी महासचिव पीसी मोदी आणि सल्लागार डॉ.पीपी रामाचार्युलू यांच्याशी चर्चा केली आहे. नायडू यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले असून त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वेळ पडली तर कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत करावी असेही नायडू यांनी म्हटले आहे. 

सर्व कर्मचार्‍यांना कोरोनासंबंधित नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे लोक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत त्यांना आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे अनेक अधिकारीही सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. 


देशात कोरोनाचा कहर

आज देशात कोरोनाचे एक लाख ५९ हजार रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ४० हजार ८६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात ५ लाख ९० हजार ६११ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात ओमिक्रॉनचे ३ हजार ६२३ रुग्ण आढळले असून १ हजार ४०९ ओमिक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत. 

सहा केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सहा केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ, पराराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांना चार जानेवारी कोरोनाची लागण झाली आहे. २ जानेवारीपासून त्यांना अस्वस्थ वाट होते. कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. गुरूवारी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. केरळच्या कझीकोडे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी