चेन्नई: तामीळनाडू (Tamil Nadu) विधानसभेची (assembly) २०२१ मध्ये होणार असलेली निवडणूक (election) अण्णाद्रमुकच्या (All India Anna Dravida Munnetra Kazhagam - AIADMK) नेतृत्वात लढवण्याचा निर्णय भाजपने (Bharatiya Janata Party - BJP) घेतला आहे. जागावाटप आणि उमेदवारीचे निर्णय योग्य वेळी घेतले जातील, असे दोन्ही पक्षांनी जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah), तामीळनाडूचे मुख्यमंत्री (Chief Minister) ई. के. पलानीस्वामी (Edappadi Karuppa Palaniswami) आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम (Ottakarathevar Panneerselvam) यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. (AIADMK-BJP alliance will fight assembly election in Tamil Nadu)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या तामीळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात शनिवारी चेन्नईतून झाली. चेन्नईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जोरदार स्वागत झाले. मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जल्लोषात स्वागत केले. गृहमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील ६७ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ झाला. यानंतर अण्णाद्रमुक आणि भाजप यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीअंती तामीळनाडूच्या विधानसभेची निवडणूक अण्णाद्रमुक आणि भाजप एकत्र लढवतील, असा निर्णय झाला.
अण्णाद्रमुक आणि भाजप यांची एक संयुक्त सभा झाली. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या सभेला उपस्थित होते. या सभेत बोलताना अण्णाद्रमुक आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा कायम असल्याचे यावेळी अण्णाद्रमुकने सांगितले.
यूपीए सरकारने तामीळनाडूच्या शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली पण त्यांची पूर्तता केली नाही. या उलट केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा केली. तामीळनाडूतील ४५ लाख शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये केंद्राकडून आतापर्यंत ४,४०० कोटी रुपये थेट हस्तांतर प्रक्रियेने मिळाले. या व्यतिरिक्त ग्रामीण सहकारी बँक आणि आरआरबी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणखी ३० हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात सर्व राज्यांचा लढा सुरू आहे. जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना संकट आजही नियंत्रणात आहे, असे अमित शहा म्हणाले. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार तामीळनाडूला आवश्यक ती मदत करत आहे आणि यापुढेही करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
तामीळनाडूची संस्कृती ही भारताच्या पुरातन संस्कृतीपैकी एक आहे. या उच्चकोटीच्या संस्कृतीने देशाला उज्ज्वल यश मिळवून दिले. कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, स्वांतत्र्याचा लढा अशा सर्व क्षेत्रांमध्ये तामीळनाडूचे मोठे योगदान आहे. हा वारसा आणि विकासाची मोठी स्वप्न उराशी बाळगून एमजीआर आणि जयललिता यांनी मोठे कार्य केले. त्यांच्या प्रमाणेच अण्णाद्रमुक आणि भाजप संयुक्तपणे तामीळनाडूच्या विकासासाठी काम करणार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.