लॉकडाऊनचा कालावधी वाढला, ट्रेन आणि विमान सेवा कधी होणार सुरु?

Domestic, international flights stoped :  कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. याचा परिणाम आता स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानाच्या उड्डाणावर परिणाम होणार आहे.

Flights
लॉकडाऊनचा कालावधी वाढला, ट्रेन आणि विमान सेवा कधी होणार सुरु?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पंतप्रधान मोदी यांनी आज (14 एप्रिल) पुन्हा एकदा देशात संबोधित केलं आणि लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजीपर्यंत वाढवला.
  • देशात कोरोना व्हायरसमुळे 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
  • देशात 25 मार्चला लॉकडाऊन लागू झाल्यापासून रेल्वे, रस्ते आणि हवाई अशी सर्व प्रकारची वाहतूक 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती.

मुंबईः कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन आज समाप्त होत आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी आज (14 एप्रिल) पुन्हा एकदा देशात संबोधित केलं आणि लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजीपर्यंत वाढवला. त्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयानं म्हटलं की, सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी उड्डाण सेवा 3 मे मध्यरात्रीपर्यंत निलंबित करण्यात येणार आहेत. देशात कोरोना व्हायरसमुळे 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ज्याचा कालावधी 14 एप्रिलला मध्यरात्री समाप्त होणार होता. यासोबतच रेल्वे वाहतूकही 3 मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

देशात 25 मार्चला लॉकडाऊन लागू झाल्यापासून रेल्वे, रस्ते आणि हवाई अशी सर्व प्रकारची वाहतूक 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती.  3 एप्रिलला एअर इंडियाने सर्व हवाई उड्डाणांचे बुकिंग 30 एप्रिलपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वे आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाने 3 मेपर्यंत सर्व सेवा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा 3 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूकही त्यामुळे बंदच राहणार आहे.

भारतीय रेल्वेवरील सर्व प्रीमियम गाड्या, मेल/एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वे इत्यादींसह सर्व प्रवासी रेल्वेसेवा 3 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत रद्द राहतील,  असं ट्वीट रेल्वे मंत्रालयाने केलं आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सर्व  नियोजित विमानसेवा 3 मे 2020 रोजी रात्री 11: 59 पर्यंत रद्द करण्यात आल्याचं ‘डीजीसीए’ने जाहीर केलं. यामध्ये आंतरराष्ट्रीय कार्गो विमानांना सूट देण्यात आलेली आहे. 

देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी माल वाहतूक चालू राहणार आहे.देशातील सर्व मेल, एक्स्प्रेस, मेट्रो, लोकल या सर्व सेवा ३ मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे येणार असल्याचे पत्रक रेल्वे बोर्डाने काढले आहे. देशातील लॉकडाऊनच्या काळात मालगाडी अधिक वेगाने धावणार आहेत. प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या थांबल्याने मालगाड्यांनी अधिक वेग घेतला आहे.  काही दिवसांपूर्वी 14 एप्रिलपासून बुकिंग सुरु होणार असल्याची अफवा पसरविण्यात येत होती. मात्र, रेल्वेने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले होते. आता लॉकडाऊन वाढल्याने रेल्वे सेवाही बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

22 मार्चपासून एका आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवण्यात आली होती. 25 मार्चला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून देशांतर्गत उड्डाणासोबतच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी