नवी दिल्ली : नेपाळमधील (Nepal) पोखरा (Pokhara) या पर्यटन शहरातून उड्डाण केल्यानंतर हिमालयाच्या (Himalaya) डोंगराळ भागात कोसळलेल्या तारा एअरच्या विमानाचे (airplane) अवशेष सापडले आहे. नेपाळी लष्कराला मुस्तांगमधील (Mustang) थासांग-२ च्या सनोसवेअरमध्ये दुर्घटनाग्रस्त तारा एअरचे विमान सापडले आहे. उत्तर-पश्चिम नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील थासांगमधील सानो स्वार भीर येथे 14,500 फूट उंचीवर दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहे. सुमारे 20 तासांनी अपघाताचे ठिकाण सापडले.
दरम्यान, विमानातील सर्व २२ जणांचा मृत्यू झाला असल्याच्या वृत्ताला नेपाळी लष्कराने याला दुजोरा दिला आहे. विमानात चार भारतीयही होते. यापूर्वी खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे विमानाचा शोध घेणे कठीण झाले होते. राजधानी काठमांडूपासून 200 किमी पूर्वेला असलेल्या पोखरा येथून सकाळी 10.15 वाजता या विमानाने उड्डाण केले होते. टर्बोप्रॉप ट्विन ऑटर 9N-AE विमान तारा एअर चालवत होते आणि रविवारी सकाळी 10 वाजता पोखरा येथून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत संपर्क तुटला होता. कॅनेडियन बनावटीचे हे विमान पोखरा येथून मध्य नेपाळमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ जोमसोमला जात होते.
मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी एएनआयला फोनवर सांगितले की, "विमान जोमसोमच्या आकाशात मुस्तांगमध्ये दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वताकडे वळले, त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही."
दरम्यान, बचाव पथकासह लष्कर आणि हेलिकॉप्टर संभाव्य घटनास्थळ शोधण्यात गुंतले होते. हे विमान पश्चिमेकडील टेकड्यांमधील जोमसोम विमानतळावर उतरणार होते, परंतु पोखरा-जोमसोम हवाई मार्गावरील घोरेपाणीवरील आकाशातील टॉवरशी त्याचा संपर्क तुटला. ‘तारा एअरच्या 'ट्विन ऑटर 9N-AET' विमानात चार भारतीय नागरिक, दोन जर्मन नागरिक आणि 13 नेपाळी प्रवासी, तीन नेपाळी क्रू सदस्य होते. कॅनेडियन बनावटीचे हे विमान पोखरा येथून मध्य नेपाळमधील जोमसोम या प्रसिद्ध पर्यटन शहराकडे जात होते. विमानाने दोन शहरांत जाण्यासाठी साधारणपणे 20-25 मिनिटे लागतात.
एअरलाइन्सने प्रवाशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी, त्यांची पत्नी वैभवी बांदेकर (त्रिपाठी) आणि त्यांची मुले धनुष त्रिपाठी आणि रितिका त्रिपाठी अशी भारतीयांची नावे आहेत. हे कुटुंब सध्या मुंबईजवळ ठाण्यात राहत होते. क्रू मेंबर्सचे नेतृत्व कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे करत होते, असे पोखरा विमानतळाचे माहिती अधिकारी देव राज अधिकारी यांनी सांगितले. सहचालक म्हणून उत्सव पोखरेल आणि फ्लाइट अटेंडंट म्हणून किस्मी थापा विमानाच्या क्रूमध्ये होते.