नवी दिल्ली : जनरल मनोज पांडे यांनी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे. रविवारी त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यानंतर साऊथ ब्लॉक परिसरात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी हवाई दल आणि नौदल प्रमुखही उपस्थित होते. विशेष म्हणजे आत्ताचे भारताचे हवाई दल, लष्कर आणि नौदलाचे नेतृत्व हे एकाच बॅचच्या तीन मित्रांकडे आहे.
लष्करप्रमुख मनोज पांडे, वायुसेना प्रमुख विवेक राम चौधरी आणि नौदल प्रमुख आर हरी कुमार 61 एनडीए अभ्यासक्रमात एकत्र होते. यापूर्वी जनरल (निवृत्त) मनोज मुकुंद नरवणे, हवाई दल प्रमुख (निवृत्त) राकेश कुमार सिंह भदौरिया आणि अॅडमिरल (निवृत्त) करमबीर सिंग हे देखील बॅचमेट होते, ज्यांनी एकत्रितपणे तिन्ही सेवांचा कार्यभार स्वीकारला होता.
जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या निवृत्तीनंतर लष्कराची कमान हाती घेतलेले जनरल मनोज पांडे यांनी रविवारी सांगितले की, लष्कर सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय लष्कराला अभिमानास्पद इतिहास आहे. राष्ट्र उभारणीत लष्कराचा मोठा वाटा आहे. जगाचे भूराजकीय चित्र झपाट्याने बदलत आहे. तिन्ही सेना एकत्र काम करणार असून आजच्या परिस्थितीसाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेशनसाठी तयार राहावे लागेल.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, देशाची सुरक्षा आणि अखंडता राखण्यासाठी लष्कराने खूप काम केले आहे. आमचे प्राधान्य ऑपरेशनल सज्जतेवर असेल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत नवीन तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. आपापसातील शक्तींचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.