अमित शहांचा चेन्नई दौरा, तामीळनाडू विधानसभेची तयारी सुरू

Amit Shah in Chennai केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तामीळनाडूच्या दौऱ्यावर आहेत.

Amit Shah in Chennai
अमित शहांचा चेन्नई दौरा 

थोडं पण कामाचं

  • अमित शहांचा चेन्नई दौरा, तामीळनाडू विधानसभेची तयारी सुरू
  • तामीळनाडू दौऱ्यात एम के अलागिरी यांचे निवडक समर्थक भाजपमध्ये प्रवेश करतील
  • अमित शहा अलागिरी आणि अभिनेता राजकारणी रजनीकांत या दोघांशी दोन स्वतंत्र भेटींमध्ये चर्चा करतील

चेन्नई: केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister) अमित शहा (Amit Shah) तामीळनाडूच्या (Tamil Nadu) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक योजनांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. हा दौरा विकास योजनांच्या शुभारंभापेक्षा राजकीयदृष्ट्या जास्त महत्त्वाचा समजला जात आहे. भाजप (Bharatiya Janata Party - BJP) पुढच्या वर्षी असलेल्या तामीळनाडू विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) डोळ्यापुढे ठेवून तयारी करत आहे. तामीळनाडू दौऱ्यात एम के अलागिरी यांचे निवडक समर्थक भाजपमध्ये प्रवेश करतील. तसेच अमित शहा अलागिरी आणि अभिनेता राजकारणी रजनीकांत या दोघांशी दोन स्वतंत्र भेटींमध्ये चर्चा करतील. याच कारणामुळे तामीळनाडूतील राजकीय वर्तुळातून अमित शहांच्या दौऱ्याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. (Amit Shah in Chennai)

तामीळनाडूत अनेक वर्षांपासून अण्णाद्रमुक (All India Anna Dravida Munnetra Kazhagam - AIADMK) आणि द्रमुक (Dravida Munnetra Kazhagam - DMK) या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. सत्तांतर झाले तरी या दोन पक्षांपैकी एक पक्ष सत्तेत येतो आणि दुसरा पक्ष मुख्य विरोधक होतो. पण अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता आणि द्रमुकचे नेते एम. करुणानिधी या दोघांच्या निधनानंतर चित्र बदलले आहे. तामीळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजप या संधीचा फायदा घेत कर्नाटक पाठोपाठ दक्षिण भारतातील आणखी एका राज्यामध्ये पाय भक्कम रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

द्रमुकचे नेते एम के स्टॅलिन (Muthuvel Karunanidhi Stalin - M. K. Stalin) आणि त्यांचे बंधू एम के अलागिरी (Muthuvel Karunanidhi Alagiri - M. K. Alagiri) या दोघांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेतून संघर्ष सुरू आहे. भाजपने ही धूसफूस ओळखून अलागिरी यांच्याशी मैत्री करण्यास सुरुवात केली आहे. अलागिरी द्रमुकमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर भाजपला तामीळनाडूत प्रवेश करण्याची संधी मिळेल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. 

अलागिरी आणि स्टॅलिन यांच्यापैकी स्टॅलिन हे संपूर्ण तामीळनाडूचे राजकारण करण्यासाठी ओळखले जातात. या उलट अलागिरी मदुराईमधील राजकारणापुरते मर्यादीत राहिल्याचे वारंवार दिसले आहे. करुणानिधी यांनीही राजकीय वारस निश्चित करताना स्टॅलिन यांना पहिली पसंती दिली. स्टॅलिन यांच्या हाती पक्षाची ताकद एकवटू लागल्यानंतर अलागिरी यांना काही काळ द्रमुकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. करुणानिधी यांच्या मृत्यू नंतर स्वतः अलागिरी यांनीच द्रमुकमध्ये माझे भविष्य सुरक्षित नाही, असे मत व्यक्त केले होते. याच कारणामुळे अलागिरी द्रमुकमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तामीळनाडूतील अनेक राजकीय जाणकारांच्या मते अलागिरी यांच्याकडे जास्त राजकीय ताकद आणि मोठे आर्थिक पाठबळ नाही. ते पक्षातून बाहेर पडले तरी द्रमुकला विशेष नुकसान होणार नाही. कदाचित २-४ दिवस अलागिरी बातम्यांमुळे चर्चेत राहतील पण स्टॅलिन आणि द्रमुक यांचे सामर्थ्य सुरक्षित आहे, असेही मत व्यक्त होत आहे. तर  अलागिरी तसेच आणखी काही लहान मोठे राजकीय गट अशी जुळवाजुळव करुन भाजप प्रादेशिक पक्षांच्या किमान काही जागा स्वतःकडे खेचण्यात यशस्वी होईल आणि राज्यात प्रवेश करेल असा अंदाज काही जाणकार व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी