Lockdown: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा, काय झाला निर्णय?

Amit Shah meets PM Modi: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर होईल असं वृत्त समोर येत आहे. 

amit shah meets pm narendra modi decision over lockdown may be announce in next tow days 
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर मोदींना भेटले अमित शहा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे 
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक 
  • शुक्रवारी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत पुढील रणनीतीबाबत केली चर्चा 

नवी दिल्ली: देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत अमित शहा यांनी पंतप्रधानांना विविध राज्यांतील कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुचवलेल्या काही सूचना आणि प्रतिक्रियांबाबतही पंतप्रधानांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत आता पुढील रणनीती कशी असेल यावर बैठकीत चर्चा झाली.

चार टप्प्यात वाढवलं लॉकडाऊन 

कोरोनाता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन २१ दिवसांचा होता. यानंतर लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला. मग लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवून १७ मे करण्यात आला. मात्र, परिस्थिती जैसे थे असल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन चौथ्यांदा वाढवत ३१ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक असाताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा केली.

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा 

पीटीआयच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान राज्यांची चिंता काय आहे आणि कोणत्या भागात १ जून पासून लॉकडाऊन काढायचा याबाबत अमित शहा यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत प्रत्येकवेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधत होते आणि त्यांचे विचार जाणून घेत होते.

एक-दोन दिवसांत होणार निर्णय 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या सर्व व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अमित शहा उपस्थित होते. अशी माहिती समोर येत आहे की, काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन काही प्रमाणात सुरूच ठेवण्याचं म्हटलं मात्र, त्याचवेळी आर्थिक उपक्रम, व्यवहार आणि सामान्य जनजीवन सुरू ठेवण्यास अनुकूलता दर्शवली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली त्यामुळे आता केंद्र सरकार लॉकडाऊन संदर्भात आपला निर्णय एक ते दोन दिवसांत जाहीर करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी