खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर?, अमित शहांची घेतली भेट  

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 25, 2019 | 20:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navneet Kaur: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

navneet rana_twitter
खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर?, अमित शहांची घेतली भेट    |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: लोकसभा २०१९ निवडणुकीत 'मोदी लाट' पुन्हा पाहायला मिळाली. यावेळी राज्यात भाजप आणि शिवसेनेला याच जोरावर भरघोस यश मिळालं. पण काही हक्काच्या जागा युतीला गमवाव्या लागल्या. त्यापैकी एक म्हणजे अमरावतीची जागा. अमरावती मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. पण यंदा अपक्ष नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंद अडसूळ यांचा पराभव करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे नवनीत राणा या बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा या देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

एकीकडे नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर दुसरीकडे त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी 'बदल होतातच' अशा आशयाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपमध्ये जाणार असा तर्क लावण्यात येत आहे. पण असं असलं तरी नवनीत राणा यांनी याबाबत बोलताना मीडियाला असं सांगितलं की, आपण फक्त अमरावतीच्या विकासकामांसाठी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्याच विषयावर चर्चा झाली. अन्य कोणत्याही नाही. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगळे तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 

 

 

नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेच्या आनंद अडसूळ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा देत आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे मतांचं धुव्रीकरण न होता नवनीत राणा आणि अडसूळ यांच्यात थेट लढत झाली. 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने बाकी आहेत. यामुळे नवनीत राणा यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट बरंच काही सांगून जाते. कारण त्यांचे पती रवी राणा हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने तेथील बरीच राजकीय समीकरणं यामुळे बदलण्याची शक्यता आहे. 

बडनेराचे आमदार रवी राणा याच्या पत्नी नवनीत राणा यांनी २०१४ पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. रवी राणा यांचाशी लग्न होण्याआधी नवनीत राणा या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेत्री होत्या. २०११ मध्ये त्यांचा विवाह रवी राणा यांच्याशी झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी