Amul appeal to PMO : "ओ शेठ! तुम्ही 'स्ट्रॉ'च बंद केला थेट!" अमुल कंपनीनं पंतप्रधान कार्यालयाला पत्र, प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीपूर्वी केल्या या मागण्या

देशभरात जुलै महिन्यापासून प्लॅस्टिकच्या स्ट्रॉवर बंदी येणार असल्यामुळे अनेक कंपन्यांना धक्का बसला आहे. त्यापैकी एक असणाऱ्या अमुल कंपनीनं पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत.

Amul appeal to PMO
'अमुल'चं पंतप्रधान कार्यालयाला पत्र  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • जुलैपासून देशभर 'सिंगल युज'वर बंदी लागू करण्याची सरकारची अधिसूचना
  • अमुल कंपनीचं पंतप्रधान कार्यालयाला पत्र
  • स्ट्रॉवर बंदी घालण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती

Amul appeal to PMO | सरकारने एकल वापराच्या प्लॅस्टिकवर (Single Use Plastic) बंदी (Ban) आणण्याचा निर्णय घेतला असून 1 जुलैपासून देशभर त्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी डेअरी प्रॉडक्ट कंपनी असणाऱ्या अमुलनं (Amul) पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिलं असून सरकारच्या या निर्णयाचा दुधाच्या विक्रीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

काय आहे निर्णय

सरकारनं सर्व प्रकारच्या ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिकवर बंदी लादण्याचा निर्णय घेतला असून आपल्या निर्णयावर ते ठाम आहे. या प्रकारच्या प्लॅस्टिकमध्ये स्ट्रॉचा देखील समावेश होतो. प्लॅस्टिक स्ट्रॉवर बंदी आली, तर अमुल कंपनीच्या विविध उत्पादनांच्या विक्रीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने प्लॅस्टिकबंदीच्या यादीतून स्ट्रॉला वगळावं, अशी मागणी अमुल कंपनीने केली आहे. मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे अमूलसह अनेक कंपन्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

या कंपन्यांनी मागितली वेळ

सरकारने प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी अमुलसह पेप्सिको आणि कोका-कोला या कंपन्यांनीही केली आहे. सरकारने या कंपन्यांना पर्यायी स्ट्रॉचा वापर सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र इको-फ्रेंडली पर्यायी पेपर स्ट्रॉ सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसून ते वापरासाठी तितकेसे परिणामकारक नसल्याचंही कंपन्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे याबाबत सरकारने काही वेळ द्यावा आणि आम्हाला तयारी करण्याच मुभा द्यावी, अशा आशयाचं पत्र अमुलनं पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं आहे. 

‘प्लॅस्टिक स्ट्रॉ’चं मोठं मार्केट

भारतात प्लॅस्टिकच्या स्ट्रॉचं मोठं मार्केट आहे. वेगवेगळे मिल्क प्रॉडक्ट्स, कोल्डिंक्स तसंच विविध प्रकारच्या टेट्रा पॅकसोबत प्लॅस्टिकचे स्ट्रॉ दिले जातात. यामुळे त्या पदार्थांचं सेवन करणं ग्राहकांना सोयीचं जातं. या सोयीचा विचार करूनच ग्राहक आपल्या दुग्ध उत्पादनांकडे वळतात, असं अमुलचं म्हणणं आहे. जर स्ट्रॉवर बंदी घातली, तर देशातील लाखो शेतकऱ्यांवरही त्याचा परिणाम होईल, असा दावा अमुलनं केला आहे. दुग्ध उत्पादन घटल्यामुळे दुधाची मागणी कमी होईल आणि याचा परिणाम कंपनीपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्व घटकांवर होईल, असा दावा ‘अमुल’नं केला आहे. 

पेपर स्ट्रॉची आयात सुरू

रिसायकलिंग बेवरेट कार्टन या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी इंडोनेशिया आणि इतर देशांमधून पेपर स्ट्रॉची आयात सुरू करण्याबाबत विचारविमर्श सुरू केला आहे. काही कंपन्यानी पेपर स्ट्रॉ आपल्या उत्पादनांसोबत देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र प्लॅस्टिकच्या तुलनेत हे स्ट्रॉ टिकाऊ नसल्याचा अनुभव काहीजण सांगतात. 

सरकार निर्णयावर ठाम

केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात या निर्णयाबाबतची अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार जुलै 2022 पासून सर्व प्रकारच्या सिंगल यूज होणाऱ्या प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. सरकारनं आपली डेडलाईन बदलली नाही, तर केवळ तीनच आठवड्यात ही बंदी देशभर लागू होणार आहे. यामुळे बड्या कंपन्यांचं धाबं दणाणलं आहे. मात्र आपण गेल्या वर्षीच कंपन्यांना याची कल्पना दिली होती. एका वर्षात कंपन्यांनी त्यांची तयारी कऱणं अपेक्षित होतं, असा दावा सरकारकडून कऱण्यात येत आहे. आता अमुल कंपनीनं लिहिलेल्या पत्रानंतर सरकार आपल्या निर्णयाबाबत काही पुनर्विचार करतं का, याबाबत उत्सुकता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी