एमबीए विद्यार्थिनीचे अपहरण आणि बलात्कार, चेहऱ्यावर केला रॉडने वार

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 15, 2020 | 12:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनी तिच्या घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले.

An MBA student allegedly abducted and gangraped by four men in UP
उत्तरप्रदेशात एमबीए विद्यार्थिनीचे अपहरण आणि बलात्कार, चेहऱ्यावर केला रॉडने वार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • उत्तरप्रदेशात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.
  • बुलंदशहरमध्ये एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
  • विद्यार्थिनी तिच्या घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले.

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनी तिच्या घरी परतत असताना तिचे अपहरण करण्यात आले.

बुलंदशहरमधील स्याना येथून एमबीए शिकत असलेली पीडित विद्यार्थिनी घरी परतत होती. त्याचवेळी काही जणांनी तिचे अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या पीडित तरूणीने विरोध केला असता आरोपींनी तिच्या चेहऱ्यावर गंभीर वार केले. लोखंडी रॉडने त्यांनी तिच्या चेहऱ्यावर जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत तिला निर्जनस्थळी सोडून हे आरोपी तिथून पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एमबीए विद्यार्थिनीचे चार जणांनी अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बुलंदशहरमधील स्याना या ठिकाणाहून पोलिसांनी पीडित मुलीला वाचवले आहे. तसेच चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, सध्या पीडित मुलीला मेरठमधील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडित मुलगी ही गढमुक्तेश्वर येथील रहिवासी आहे. गुरूवारी ही तरूणी मेरठमधील कॉलेज संपवून बसने आपल्या घरी निघाली होती. संध्याकाळी बराच वेळ झाल्यामुळे कुटुंबियांनी त्यांच्या मुलीविषयी शोधाशोध करण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर ती बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे मोबाइल लोकेशन पाहिले असता ते स्याना या ठिकाणी मिळाले. पोलीस तिथे पोहोचले असता ती त्यांना बेशुद्धावस्थेत सापडली.

 

 

ही विद्यार्थिनी बसने घरी जात असताना वाटेत बस बंद पडली. त्यादरम्यानच तिची ओळख चार कारमध्ये असलेल्या व्यक्तींशी झाली. त्यांनी तिला घरी जाण्यास लिफ्ट दिली. त्यानंतर या चौघांनी तिला निर्जनस्थळी नेत वारंवार सामूहिक बलात्कार केला.

उत्तरप्रदेशात अशाप्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी फिरोजाबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली आहे. त्यांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी