Fraud marriage : एकामागून एका तरुणीशी सलगी करत त्यांना गंडवणाऱ्या आणि लाखो रुपये लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. लग्नाचं अमिष दाखवून हा तरुण तरुणींसोबत ओळख वाढवत असे. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उधार घेत असे. पैसे हातात आल्यावर त्यांच्याशी केलेला लग्नाचा करार मोडून पोबारा करत असे. आतापर्यंत सराईतपणे हा गोरखधंदा करणाऱ्या तरुणाला एका तरुणीच्या तक्रारीनंतर मात्र अटक करण्यात आली.
आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील 33 वर्षांच्या अदापा शिव शंकर बाबू या तरुणाने एका तरुणीशी मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख काढली. तिच्यासोबत ओळख प्रस्थापित केल्यानंतर तिला भेटायला बोलावलं. हळूहळू दोघांची ओळख वाढत गेली. काही दिवसांनी अदापानं या महिलेकडून 30 लाख रुपये उधार घेतले. त्याचप्रमाणं तिच्याकडे असणारं सोनं ताब्यात घेऊन ते गहाण ठेवलं. एकंदरीत 50 लाख रुपयांना चुना लागल्याचं लक्षात आल्यावर तरुणीनं अदापाची माहिती काढायला सुरुवात केली.
आतापर्यंत इतरही काही मुलींना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचं या तरुणीच्या लक्षात आलं. अगोदर गोड बोलून तो तरुणींशी चांगले संबंध प्रस्थापित करायचा. शिवाय घटस्फोटित तरुणींना गळाला लावण्याचाही त्याने प्रयत्न केल्याची माहिती तरुणीला मिळाली. काही दिवसांनी अदापाने तरुणीसोबत संपर्क टाळायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर तो तिचे फोनही घेईनासा झाला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तडक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
अधिक वाचा - Black Alien : नखापासून बुब्बुळापर्यंत टॅटूच टॅटू, अवतार पाहून कुणीच देईना नोकरी, प्रयोगशील कलाकाराची कैफियत
पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत अदापाने सहा तरुणींना लग्नाचं अमिष दाखवून गंडा घातल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. गचिबाओली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात अदापाची मोडस ऑपरेंडीच समोर आली. मॅट्रिमोनिअल साईट्सच्या माध्यमातून तो घटस्फोटित महिलांशी संपर्क साधत असे. त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन करत असे. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे लाटून पोबारा करत असे. आपली नाहक बदनामी टाळण्यासाठी हा महिला शांत बसायच्या आणि पोलिसांकडे जाणं टाळायच्या, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र सातव्या महिलेनं ही चूक न करता आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याक्षणी पोलिसांत धाव घेतली.
अधिक वाचा - Triple Murder: मुलगी, आईसह महिला पोलिसाचा मृतदेह आढळला; पोलीस लाईनमध्ये ट्रिपल मर्डरने एकच खळबळ
अदापानं आतापर्यंत वेगवेगळ्या तरुणींकडून 50 लाखांपेक्षाही जास्त रोख रक्कम लुबाडल्याचं तपासात दिसून आलं आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत एकूण 20 तोळे सोनंही त्यानं गहाण ठेवायला भाग पाडल्याचं दिसून आलं. याशिवाय कित्येक लोकांना नोकरी लावण्याच्या अमिषानेही गंडवलं असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्याला विशाखापट्टणममधून अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.