Sonali Phogat Latest Video: पणजी: भाजप (BJP) नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाटच्या (Sonali Phogat) मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. सोनालीचा नेमका मृत्यू कसा झाला याचा शोध लावण्याचं आता आव्हान गोवा पोलिसांसमोर (Goa Police) असून ते याच प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. दरम्यान, सोनाली फोगाटचा आणखी एक नवीन व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी सुधीर सांगवान हा सोनालीला गोव्यातील नाईट क्लबमध्ये अंमली पेय (Drinks) पिण्यास जबरदस्ती करत असल्याचं दिसत आहे. (another video before bjp leader and actress sonalis death surfaced you will also be surprised to see sudhir sangwan action)
सुधीर सांगवान करत होता जबरदस्ती
सोनाली फोगाट हिला जबरदस्तीने काही अप्रिय पदार्थ देण्यात आले होते. असं आता गोवा पोलिसांनी देखील म्हटलं आहे. आता तशाच स्वरुपाचा व्हिडिओ समोर आल्याने सोनालीला अंमली पदार्थ देताना जबरदस्ती करण्यात आल्याचं समोर आलं आहे. गोवा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट खून प्रकरणात आतापर्यंत सुमारे 20 ते 25 जणांची चौकशी करण्यात आली आहे.
रूम बॉयने पुरवलेलं ड्रग्स
सोनाली फोगटच्या हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी शनिवारी आणखी दोघांना अटक केली आहे. आरोपी सुधीर सांगवान याने दिलेल्या जबाबच्या आधारे कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून सोनालीला दिलेले अंमली पदार्थ देखील जप्त करण्यात आले आहे. मेटामेम्फेटामाइन नावाचं हे ड्रग्स होतं. अंजुना येथील हॉटेल ग्रँड लिओनी रिसॉर्टमध्ये रूम बॉय म्हणून काम करणार्या दत्तप्रसाद गावकरने हे ड्रग्ज पुरवले असल्याचे चौकशीत समोर आलं आहे. याच हॉटेलमध्ये आरोपी सांगवान आणि सोनाली फोगाट हे थांबले होते.
अधिक वाचा: चंडीगढला निघालेली Sonali Phogat गोव्याला कशी पोहोचली? स्वीय सहाय्यकाने केला घात?
आरोपींची तुरुंगात रवानगी
गोवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी देखील पुष्टी केली की कर्लिन्स रेस्टॉरंट (Sakes)चे मालक एडविन आणि ड्रग्ज पेडलरविरोधात एनडीपीएसचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस, सहाय्यक सरकारी वकील यांनी न्यायालयाला सांगितले की हे आरोपी मूळचे गोव्याचे नाहीत. तसेच आणखीही आरोपींचा या प्रकरणात सहभाग असू शकतो. याप्रकरणी पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंह या दोन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याआधी आज अंजुना पोलिसांनी आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांची वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यानंतर दोघांना पुन्हा अंजुना पोलीस लॉकअपमध्ये आणण्यात आले आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणांशी संबंधित आणखी अनेक लोकांची चौकशी होणार असल्याचे संकेतही गोवा पोलिसांच्या सूत्रांनी दिले. डीजीपी गोवा म्हणाले की, गरज भासल्यास गोव्यातून एक पथक हरियाणाला पुढील तपासासाठी पाठवले जाईल.